‘आम्ही बोलत बोलत गेलो, लपून छपून गेलो नाही. मात्र आम्हाला परत बोलवायचे आणि आमचे पुतळे जाळायचे. पक्षातून हकालपट्टी करायची, असे यांचे ठरले होते. दिल्लीत भाजपच्या नेतृत्वाशी चर्चा करायची. त्यांना कशाला घेता, आम्हीच येतो तुमच्यासोबत, असे सांगायचे. असा प्रकार त्या वेळी घडला होता. मात्र, शिवसैनिकांचे होणारे खच्चीकरण थांबवण्यासाठी आणि काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेनेला वाचवण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले. पाऊल टोकाचे आणि धाडसाचे होते. त्याला हिंमत लागते,’ असेही शिंदे म्हणाले.
‘भाजपसोबत आमची वैचारिक युती होती. बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन आणि मुंडे यांच्या प्रयत्नाने ही युती झाली. ती युती आम्ही पुन्हा केली. त्यांनी तोडली होती. त्यांनी जी चूक केली ती आम्ही दुरुस्त केली,’ असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ‘मी साधा, सरळ माणूस आहे. मला सत्ता आणि पैशाचा मोह नाही. पैशाचा मोह कुणाला? खोक्यांचा मोह कुणाला? हे जनता जाणते. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे आहे. शिवसैनिकाला पालखीत बसवायचे आहे, असे सतत उद्धव ठाकरे म्हणत होते. पण जेव्हा स्वार्थ जागृत होतो, तेव्हा शिवसैनिकांची किंमत नसते,’ असा टोला शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
‘मला पदाची आणि सत्तेची हाव नव्हती. मला संधी मिळाली. त्याचे मी सोने करतोय,’ असेही शिंदे म्हणाले. ‘हे सरकार घरात बसणारे नाही. फेसबुक लाइव्ह करणारे नाही. उंटावरून शेळ्या हाकणारे सरकार नाही. फेस टू फेस काम करणारे सरकार आहे. काम करणाऱ्या सरकारच्या मागे जनता उभी राहील. घरी बसणाऱ्यांच्या नाही. आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन लोकांमध्ये जात आहोत,’ असेही शिंदे यांनी सांगितले.