यंदा वंचितचं काय? महायुती, मविआला समान न्याय; समोर आला आश्चर्यजनक आकडा, कोणाला किती फटका?

मुंबई: लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीनं बरेच प्रयत्न केले. पण जागावाटपाच्या चर्चेत बिनसल्यानं वंचितनं एकला चलो रेची भूमिका घेतली. गेल्या निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांनी घेतलेल्या लक्षणीय मतांचा फटका काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीला बसला. वंचितमुळे आघाडीचे ६ उमेदवार पराभूत झाले. यंदा मात्र वंचितचा प्रभाव किंचित दिसून आला.

मागील लोकसभा निवडणुकीत नांदेड, सांगली, बुलढाणा, हातकणंगले, परभणी, यवतमाळमध्ये वंचितमुळे आघाडीचे उमेदवार पराभूत झाले. युतीच्या उमेदवारांच्या मताधिक्क्यापेक्षा अधिक मतं वंचितच्या उमेदवारांनी घेतल्यानं आघाडीला बसला. त्यामुळे यंदा स्वबळावर लढणारी वंचित काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. यंदाच्या आकडेवारीकडे नजर टाकल्यास वंचितमुळे महायुती, महाविकास आघाडीला समान फटका बसला आहे.
आकड्याचा घटला जोर, शिंदेंच्या आमदारांकडून परतीचे दोर? घरवापसीसाठी ठाकरेसेनेकडून महत्त्वाची अट
यंदा राज्यात लोकसभेची निवडणूक जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये अतिशय चुरशीची झाली. या घासून झालेल्या निवडणुकीत वंचितनं फारशी मतं घेतली नाहीत. पण ८ मतदारसंघांमध्ये त्यांच्या उमेदवारांना मिळालेली मतं विजयी उमेदवारांच्या मताधिक्क्यापेक्षा अधिक आहेत. अकोला, बुलढाणा, हिंगोली, शिर्डी, नांदेड, बीड, हातकणंगले, मुंबई वायव्यमध्ये वंचितच्या उमेदवारांनी ही किमया साधली. विशेष म्हणजे या ८ जागांपैकी ४ जागांवर महायुतीला, तर ४ जागांवर महाविकास आघाडीला यश मिळालं आहे. त्यामुळे वंचितनं यंदा सत्ताधारी आणि विरोधकांना समान फटका दिला आहे.

वंचितनं यंदा ३८ जागा लढवल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी त्यांचे उमेदवार फारसे प्रभावी नव्हते. काही ठिकाणी उमेदवार अचानक बदलण्यात आले. याचा फटका वंचितला बसला. ३८ पैकी ३७ जागांवर वंचितच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. एकट्या प्रकाश आंबेडकरांची अनामत रक्कम वाचली. ते अकोल्यातून निवडणूक लढले. अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे ४ लाख ५७ हजार ३० मतं घेत विजयी झाले. काँग्रेसच्या अभय पाटलांनी ४ लाख १६ हजार ४०४ मतं घेतली. त्यांचा ४० हजार ६२६ मतांनी पराभव झाला. इथे प्रकाश आंबेडकरांनी २ लाख ७६ हजार ७४७ मतं घेतली.