मोबाइल प्रकरण आले अंगलट, कळंबा कारागृहातील दोन अधिकाऱ्यांसह नऊ कर्मचारी बडतर्फ

संदीप भातकर, येरवडा : कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात विशेष पथकाने घेतलेल्या झडतीत पंचवीस दिवसांत ८०हून अधिक कैद्यांकडे मोबाइल मिळाले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीत कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचे आढळून आल्याने कारागृह प्रशासनाने दोन तुरुंग अधिकाऱ्यांसह नऊ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘मटा’ला ही माहिती दिली.

कळंबा मध्यवर्ती कारागृहात मागील काही काळापासून कैद्यांकडे सतत मोबाइल आणि सिमकार्ड सापडून येण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे कारागृह अधीक्षक पांडुरंग भुसारे यांची येरवडा आणि उपअधीक्षक साहेबराव आडे यांची सोलापूर कारागृहात बदली करण्यात आली आहे; तसेच या प्रकरणाच्या तपासासाठी कारागृह प्रशासनाने वरिष्ठ अधिकारी आणि पाच कर्मचारी अशा पंधरा जणांचे विशेष पथक कोल्हापूर कारागृहात नियुक्त केले. विशेष पथकाने ३० मार्चपासून दररोज कारागृहातील कैद्यांची झडती घेऊन पंचवीस दिवसांत ८०हून अधिक मोबाइल आणि सिमकार्ड जप्त केले. खुल्या जागा, भिंतीत, स्वच्छतागृहात आणि काही बरॅकच्या कोपऱ्याजवळ मोबाइल लपवण्यात आले होते. या प्रकरणी कोल्हापूर येथील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मध्यवर्ती कारागृहात एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोबाइल आणि सिमकार्ड सापडून येत असल्याच्या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेतली. या प्रकरणी कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर आणि हलगर्जीपणा केल्याचे चौकशीत आढळून आले. त्यामुळे कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी दोन वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्यांच्या बडतर्फीचे आदेश काढले असून, कारागृह उपमहानिरीक्षक (पश्चिम विभाग) स्वाती साठे यांनी नऊ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे.

अधिक बोलण्यास अधिकाऱ्यांचा नकार

कारागृह विभागात प्रथमच मोबाइल प्रकरणात अकरा जणांवर बडतर्फीची कारवाई झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘मी माहिती देऊ शकत नाही,’ असे सांगून अधिक बोलणे टाळले. कारागृह महानिरीक्षक (विशेष) जालिंदर सुपेकर यांनीही यावर बोलण्यास नकार दिला. साताऱ्याचे तत्कालीन अधीक्षक श्यामकांत शेडगे यांच्याकडे सध्या कळंबा कारागृहाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.

अधीक्षकांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे?

कळंबा मध्यवर्ती कारागृहात एवढ्या मोठ्या संख्येने मोबाइल सापडून येत असल्याने कारागृहाचे अधीक्षक पांडुरंग भुसारे यांची येरवडा आणि उपअधीक्षक साहेबराव आडे यांची सोलापूर कारागृहात बदली करण्यात आली आहे. दोन्ही अधिकारी अधीक्षक दर्जाचे असल्याने त्यांच्यावरील बडतर्फ कारवाईचा प्रस्ताव प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठविला असल्याचे समजते. सरकारच्या आदेशानंतर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. याबाबत कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
अरविंद केजरीवालांना इन्सुलिन द्यायचे की नाही, निर्णय मेडिकल बोर्ड घेणार, दिल्ली कोर्टाचा निर्णय
कळंबा कारागृहातील बडतर्फ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे
सोमनाथ म्हस्के (वरिष्ठ तुरुंग अधिकारी)
सतीश कदम (वरिष्ठ तुरुंग अधिकारी)
अभिजित गोसावी (कर्मचारी)
तानाजी गायकवाड
रवी पवार
वैभव पाटील
अनिकेत आल्हाट
वैशाली पाटील
सुहास वरखडे
संजय टिपूगडे
हांडे (पूर्ण नाव उपलब्ध नाही)