मोदींना मित्रपक्षांच्या नेत्यांवर भरवसा नाय का? आश्चर्यजनक आकडेवारी समोर, राज्यात काय घडतंय?

मुंबई: सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं एनडीएतील घटक पक्षांसाठी जोर लावल्याचं चित्र आहे. अब की बार ४०० पारचं लक्ष्य साध्य करण्यासाठी मित्रपक्षांची कामगिरी चांगली होणं गरजेचं आहे. बिहार आणि महाराष्ट्रात भाजपनं मित्रपक्षांना बऱ्यापैकी जागा सोडल्या आहेत. मात्र मित्रपक्ष त्यांच्या ताकदीवर जागा निवडून आणतील असा विश्वास भाजपला वाटत नसल्याचं दिसतंय. त्यामुळेच मित्रपक्षांच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अधिकाधिक सभा आयोजित केल्या जात आहेत. महाराष्ट्र आणि बिहारमध्ये मोदी मित्रपक्षांसाठी प्रचारसभा घेत जोरदार बॅटिंग करत आहेत.

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८, तर बिहारमध्ये ४० जागा आहेत. मोदींनी महाराष्ट्रात आतापर्यंत १४ सभा घेतल्या आहेत. हा आकडा १७ ते १८ पर्यंत जाऊ शकतो. विशेष म्हणजे हा आकडा मागील लोकसभा निवडणुकीत घेतलेल्या सभांपेक्षा दुप्पट आहे. २०१९ मध्ये मोदींनी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात ९ सभा घेतल्या होत्या. त्यावेळी ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत होती. शिवसेना एकसंध होती. यंदा तशी परिस्थिती नाही. त्यामुळे भाजपसाठी परिस्थिती आव्हानात्मक आहे. राज्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी असं महायुतीचं सरकार आहे. पण तरीही महाविकास आघाडीनं उभं केलेलं आव्हान पाहता मोदींच्या सभांची संख्या वाढवण्यात आलेली आहे.
माझा लहान भाऊ तोफ, त्याला महत्प्रयासानं रोखलंय, अन्यथा…; ओवैसींचा नवनीत राणांना इशारा
बिहारमध्ये मोदींनी आतापर्यंत सहा प्रचारसभा घेतल्या आहेत. १२ आणि १३ मे रोजी मोदी बिहार दौऱ्यावर असणार आहेत. १२ मे रोजी त्यांचा रोड शो असेल. तर १३ मे रोजी त्यांच्या तीन सभा होतील. १३ मेपर्यंत बिहारमध्ये मोदींच्या ९ सभा झालेल्या असतील. यापैकी पाच सभा मित्रपक्ष लढवत असलेल्या मतदारसंघांमध्ये होतील. बिहारमध्ये भाजपचे तीन मित्रपक्ष आहेत. यामध्ये जनता दल युनायटेड, लोकजनशक्ती पार्टी, हिंदुस्तान आवाम मोर्चा यांचा समावेश होतो.
भुजबळांनी राजीनामा द्यावा! सेना आमदाराची मागणी; महायुतीत जुंपली, ‘मित्रां’मुळे भाजपची गोची
महाराष्ट्रात मोदींनी आतापर्यंत १४ सभा घेतल्या आहेत. यापैकी ४ सभा मित्रपक्षांसाठी (शिंदेसेना, राष्ट्रीय समाज पक्ष) घेण्यात आल्या. १५ मे रोजी मोदींच्या आणखी २ सभा होतील. त्यात शिवसेनेसाठी होतील. नाशिक आणि कल्याणमध्ये मोदींची सभा होईल. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये ४ जागा लढवत आहेत. पण त्यांच्या वाट्याला आलेल्या जागांवर मोदींनी सभा घेतलेली नाही.

बिहारमधील १७ आणि महाराष्ट्रातील २८ जागांवर भाजपची स्थिती मजबूत आहे. पण भाजपच्या मित्रपक्षांची अवस्था तितकीशी मजबूत नसल्याचं राजकीय जाणकार सांगतात. भाजपचे मित्र पक्ष ‘मोदी मॅजिक’वर अवलंबून आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपसोबत आले. त्यानंतर अद्याप तरी त्यांच्या नेतृत्त्वात पक्षानं निवडणूक लढवलेली नाही. त्यातच उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबद्दल राज्यात सहानुभूती आहे. त्यामुळे या शिंदे आणि अजित पवारांच्या उमेदवारांसाठीही मोदींनी सभांचा धडाका लावला आहे.