महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आज शिरुर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यासोबत देवदत्त निकम, शेखर पाचुंदकर, स्वप्नील गायकवाड,दामु घोडे, शंकर जांभळकर आदी उपस्थित होते.
मत मागायला तिकडेच जा, इकडे येऊच नका!
डॉ. कोल्हे पुढे म्हणाले की, तुमच्या कांद्याची माती होती. तुमच्या ताटात माती कालवली जाती, याच्याशी मोदी सरकारला काही देणेघेणे नाही. हे आजच्या निर्णयावरून मोदी सरकारने दाखवून दिलं आहे.
जर मोदी सरकार फक्त गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी निर्णय घेत असेल तर आपण पण त्यांना सांगू शकतो मत मागायला तिकडेच जा. इकडे येऊच नका. असं सांगत भाजपच्या या निर्णयाला डॉ. कोल्हे यांनी कडाडून विरोध केला.
आढळरावांची कोल्हेंवर टीका
‘निवडणूक जवळ आली म्हणून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना शेतीमालाला भाव मिळत नसल्याची आठवण झाली आहे. पाच वर्षे चित्रीकरणात व्यस्त असलेल्या कोल्हेंना निवडणुकीमुळे शेतकऱ्यांचा अचानक कळवळा आला आहे, अशी टीका करतानाच साडेचार वर्षे कांद्याला भाव होता का, शेतकरी सुखात होता,’ असे वक्तव्य शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले. साडेचार वर्षे कांद्याला भाव नव्हता, अशी कबुली आढळरावांनी दिल्याची चर्चा रंगली आहे. ‘मी केलेल्या कामावर स्वत:च्या नावाचा शिक्का मारून प्रचार केला जात आहे,’ अशी टीका त्यांनी केली. वैयक्तिक टीकेमुळे देशाच्या विकासाच्या मुद्द्यापासून आपण फारकत घेत आहोत, अशी पुस्ती त्यांनी जोडली.
पाच वर्षांपूर्वी एकाला निवडून दिल्याच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांच्या व्यथा मी आता ऐकत आहे. अडचणीत धावून जावे, दोन शब्द प्रेमाने बोलावे, जमले तर विकास करावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. हे महाशय मात्र पाच वर्षे फिरकले नाही, असे आढळराव म्हणाले.