डॉ. श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदार संघातून सलग तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. शिवसेनेतील युवा नेते म्हणून त्यांची ओळख आहे. परंतु, त्यांच्याऐवजी पक्षातील इतर ज्येष्ठ खासदारांना मंत्रिपदाची संधी दिली जाईल, असे सूत्रांनी म्हटले आहे.
मोदी ‘एनडीए’चे नेते, तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार
नवी दिल्लीत पंतप्रधान निवासस्थानी बुधवारी झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘एनडीए’च्या नेतेपदी सर्वसंमतीने निवड करण्यात आली. मोदी यांनी मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारस केल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सतरावी लोकसभा विसर्जित केली. एकहाती बहुमतापासून दूर असलेल्या भाजपने लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्याच दिवशी बुधवारी मित्रपक्षांची बैठक बोलावली. यावेळी ‘एनडीए’मधील १६ पक्षांचे २१ नेते उपस्थित होते. यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तेलुगू देसमचे नेते एन. चंद्राबाबू नायडू, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यासह जीतनराम मांझी, पवन कल्याण, अनुप्रिया पटेल, चिराग पासवान, एच. डी. कुमारस्वामी व जयंत चौधरी उपस्थित होते.