म्हणूनच आपल्या मतदारांनी आपली साथ सोडली…!
इंडिया आघाडीकडून जाणीवपूर्वक मुस्लिम, दलित आणि आदिवासी बांधवांची दिशाभूल करण्यासाठी अपप्रचार करण्यात आला. भाजपची ‘चारसौ पार’ ही घोषणा संविधान बदल करण्यासाठी दिली गेली, हे विरोधकांनी जनतेच्या मनावर बिंबवले, हे मी पिंपळगावच्या सभेत मोदींनाही म्हणालो, असे भुजबळ यांनी आवर्जून सांगितले. तसेच भाजपने देखील मुस्लीम ‘हे करतील- ते करतील’ अशी विधाने प्रचारांत केली. संविधान बदलणार म्हणजे आपले आरक्षण जाणार हे आदिवासींना वाटल्याने त्यांनीही महायुतीची साथ सोडली. मोठे समाज ज्यावेळी निवडणूक काळात दुरावतात त्यावेळी काय होते, हे आता त्यांना कळाले असेल. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दुरावलेले समाज पुन्हा आपल्यासोबत यावेत, यासाठी राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांना मोठे कष्ट घ्यावे लागतील, असे भुजबळ म्हणाले.
भाजपच्या दबावाला बळी पडू नका
आपल्यासमोर आता विधानसभेची निवडणूक आहे म्हणजेच या निवडणुकीत आता संविधान बदलाचा विषय येत नाही. मुस्लिम, दलित आदिवासी, ओबीसी, भटके हे आपले दुरावलेले मतदार आपल्याकडे पुन्हा कसे येतील, यासाठी गांभीर्याने काम करावे लागेल. आपण भाजपसोबत बसणार आहोत. त्यांना काही गोष्टी रुचतील, काही खटकतील पण म्हणून आपण त्यांच्या दबावाला बळी पडता कामा नये, तरच आपले मतदार आपल्यापासून दुरावणार नाहीत, असेही निक्षून भुजबळ यांनी सांगितले.
दलित-मुस्लिमांना आम्ही तुमच्यासोबत आहोत हा विश्वास द्यावा लागेल
निवडणुकीचे राजकारण करताना सगळ्या समाज घटकांना सोबत घेऊन चालले पाहिजे. जिथे अल्पसंख्याकाची शक्ती असेल तिथे त्यांचा विचारही व्हायला हवा. मुस्लिम जर भुजबळांना मत देत असतील तर मी देखील धर्म वगैरे काहीही मनात न ठेवता त्यांना मदत केलीच पाहिजे. आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत, हा विश्वास त्यांना आपल्यावा द्यावा लागेल, त्यासाठी हवे तर समित्या वगैरे नेमा पण सामाजिक अभिसरण झालेच पाहिजे, असे अधिकारवाणीने भुजबळ यांनी सांगितले.
“न हरूँगा हौसला उम्रभर, ये मैने खुदसे वादा किया हैं”
यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान मला भाषणाची संधी फार कमी मिळाली. काहींना वाटायचे याला बोलावले तर आपली मते जातील. काहींनी तर बॅनरवर फोटोही लावला नाही. पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. जायची ती मते गेलीच. पण अशांना सांगतो “न हरूँगा हौसला उम्रभर, ये मैने खुदसे वादा किया हैं” अशी शेरोशायरी करून त्यांनी पक्षांतर्गत विरोधकांना तसेच प्रतिस्पर्ध्यांना इशारे देऊन पुढील इरादे स्पष्ट केले.