जलवाहिनीची ही गळती लवकर दुरुस्त करावी लागणार आहे. अन्यथा गळतीमुळे पाणी वाया जाण्यासह रस्ता खचण्याचा धोकाही निर्माण होऊ शकतो. दुरुस्तीसाठी सात ते आठ तास पाणीपुरवठा खंडित ठेवावा लागणार आहे. मंत्रालय व मरिन ड्राइव्ह हा परिसर महत्त्वाचा असल्याने महापालिकेने मरिन ड्राइव्ह वाहतूक पोलिसांशी तातडीने संपर्क साधून दुरुस्ती कामाचे प्राधान्य त्यांना कळवले आहे. त्यानुसार वाहतुकीचे नियोजन करण्याच्या दृष्टीने दुरुस्ती कामाची परवानगी घेतली आहे.
मरिन ड्राइव्ह वाहतूक पोलिसांनी ११ मे रोजी जलवाहिनीच्या दुरुस्तीची परवानगी दिली आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या जलअभियंता विभागांतर्गत दुरुस्ती विभागाने ११ मे रोजी दुपारी ३.३० ते रात्री ११.३० या आठ तासांच्या कालावधीत दुरुस्ती कामे हाती घेण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी सकाळी ९ वाजल्यापासून खोदकाम सुरू केले जाईल. जलवाहिनीतील पाण्याचा उपसा करून, नंतर प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम दुपारी ३.३० वाजल्यापासून केले जाणार आहे. संबंधित भागात सकाळ व दुपारच्या सत्रात पाणीपुरवठा केला जाणार आहे.
० पाणीपुरवठ्याच्या वेळांत बदल (दुपारी ३.३० ते रात्री ११.३० या आठ तासांच्या दुरुस्ती कालावधीसाठी)
१. या परिसरांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद
– कुलाबा (नियमित पाणीपुरवठा सायं. ४.३० ते ६.३० वा.), कोळीवाडा (अतिरिक्त पाणीपुरवठा सायं ६.३० ते सायं ६.४५), नौदल परिसर (अतिरिक्त विशेष पाणीपुरवठा सायं. ६.५० ते सायं ७.०५ वा) हा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
२. या परिसराला विलंबाने पाणीपुरवठा
– नौदलाला रात्री १०.३० ते पहाटे २.५० या कालावधीत केला जाणारा नियमित पाणीपुरवठा दुरुस्ती काम पूर्ण झाल्यानंतर, म्हणजेच नियमित पाणीपुरवठ्याच्या तुलनेत विलंबाने होणार आहे.
दुरुस्तीची आवश्यकता लक्षात घेता कुलाबा, कोळीवाडा आणि नौदल परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.