मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघांत ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. यात दक्षिण मुंबईचे अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईचे अनिल देसाई आणि उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील संजय दिना पाटील यांचा समावेश आहे. ज्या दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत निवडून आले त्या मतदारसंघात भायखळा आणि मुंबादेवी हे दोन विधानसभा मतदारसंघ येतात. हे मतदारसंघ मुस्लिमबहुल आहेत. यातील भायखळा विधानसभा मतदारसंघात सावंत यांना ८६ हजार ८८३, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार यामिनी जाधव यांना ४० हजार ८१७ मते मिळाली आहेत. येथे जाधव यांच्यापेक्षा सावंत यांना ४६ हजार ६६ मते जास्त आहेत. त्यानंतर मुंबादेवी मतदारसंघात सावंत यांना ७७ हजार ४६९, तर जाधव यांना ३६ हजार ६९० मते आहेत. येथे सावंत यांना जाधव यांच्यापेक्षा ४० हजार ७७९ मते जास्त आहेत. अरविंद सावंत यांनी यामिनी जाधव यांचा ५२ हजार ६७३ मतांनी पराभव केला आहे. भायखळा आणि मुंबादेवी मतदारसंघांत मिळालेली जवळपास ८० हजार मतांची आघाडी सावंत यांच्या विजयास आणि जाधव यांच्या पराभवास कारणीभूत ठरली आहे.
उत्तर पूर्व मुंबईमध्ये भाजपच्या मिहीर कोटेचा यांचा शिवसेना (उबाठा) पक्षाचे संजय दिना पाटील यांनी २९ हजार ८६१ मतांनी पराभव केला आहे. मुलुंडमध्ये कोटेचा यांना १ लाख १६ हजार ४२१ मते मिळाली आहेत, तिथे पाटील यांना निम्मी अर्थात ५५ हजार ९७९ मते मिळाली आहेत. या विधानसभा मतदारसंघात कोटेचा यांनी ६० हजार ४४२ मतांची आघाडी घेतली. मात्र मानखुर्द शिवाजीनगर येथे कोटेचा यांना २८ हजार १०१ मते, तर संजय पाटील यांना १ लाख १६ हजार ७२ मते मिळाली आहेत. मुस्लिम लोकवस्ती सर्वाधिक असलेल्या या मतदारसंघात संजय पाटील यांना कोटेच्या यांच्यापेक्षा ८७ हजार ९७१ मतांची आघाडी मिळाली आहे. ही आघाडीच कोटेच्या यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. या मतदारसंघातील मतांच्या आघाडीने कोटेच्या यांच्या मुलुंडमधील मतांच्या आघाडीवर मात केल्याचे दिसते.
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात आमदार नवाब मलिक यांचा अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ हा मुस्लिमबहुल आहे. या मतदारसंघात देसाई यांना ७९ हजार ७६७ मते, तर शेवाळे यांना ५० हजार ६८४ मते मिळाली आहेत. येथे देसाई यांनी शेवाळे यांच्यापेक्षा २९ हजार ८३ हजार मतांची आघाडी घेतली आहे. देसाई हे शेवाळे यांच्यापेक्षा ५३ हजार ३८४ अधिक मते घेऊन निवडून आले आहेत. देसाई यांच्या विजयात अणुशक्तीनगरमधील २९ हजार मतांचा वाटा मोठा आहे.
उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात भाजपचे अॅड. उज्ज्वल निकम यांचा काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी पराभव केला आहे. गायकवाड यांनी निकम यांचा १६ हजार ५१४ मतांनी पराभव केला आहे. या लोकसभा मतदारसंघातील कुर्ला विधानसभा मतदारसंघात निकम यांना ५८ हजार ५५३ हजार मते, तर गायकवाड यांना ८२ हजार ११७ मते मिळाली आहेत. येथे गायकवाड यांनी निकम यांच्यापेक्षा २३ हजार ५६४ मतांची आघाडी घेतली आहे. याशिवाय वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात निकम यांना ४७ हजार ५५१ मते, तर गायकवाड यांना ७५ हजार १३ मते मिळाली आहेत. येथे गायकवाड यांनी निकम यांच्यापेक्षा २७ हजार ४६२ मतांची आघाडी घेतली आहे. मुस्लिम लोकवस्ती अधिक असलेल्या या दोन विधानसभा मतदारसंघांतील जवळपास ५० हजार मतांच्या आघाडीने वर्षा गायकवाड यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विशेष म्हणजे आघाडीतील घटक पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे गायकवाड यांचा हा विजय सुकर झाल्याचे बोलले जाते.
औरंगाबादेत मात्र फटका
औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या संदिपान भुमरे यांनी ४ लाख ६८ हजार १३८ मते घेत विजय मिळवला. या मतदारसंघात शिवसेना (उबाठा) पक्षाचे चंद्रकांत खैरे यांना २ लाख ८६ हजार मते मिळाली आहेत. मात्र, ‘एमआयएम’चे इम्तीयाज जलील यांना ३ लाख ३७ हजार मते पडली आहेत. येथे मुस्लिम समाजाचा उमेदवार रिंगणात नसता तर भुमरे आणि खैरे यांच्यात थेट लढत होऊन येथे मुस्लिम समाजाच्या मतांचा फायदा खैरे यांना होऊ शकला असता. मात्र, मुस्लिम उमेदवार रिंगणात असल्याने त्यांना फटका बसल्याची चर्चा आहे.