मुळशी पॅटर्नचे आकर्षण; तरुणाई गुन्हेगारीच्या विळख्यात, तीनशेहुन अधिक मुले गुन्हेगारांच्या संपर्कात

प्रतिनिधी, पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील सव्वातीनशे तरुण अट्टल गुन्हेगारांच्या संपर्कात असून, ते गुन्हेगारी विश्वात प्रवेश करणार असल्याची गोपनीय माहिती पोलसांना मिळाली आहे. स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी या तरुणांवर नजर ठेवून त्यांच्या हलचाली टिपल्या आहे.हे तरुण गुन्हेगारीकडे आकर्षित झाले असून, अट्टल गुन्हेगारांच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. दरम्यान, गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांकडून या तरुणांना गुन्हेगारी क्षेत्रापासून दूर लोटण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. वरिष्ठ अधिकारी या तरुणांचे समुपदेशन करून त्यांचा गुन्हेगारीपासून परावृत्त करीत आहेत.

पालकांनो सावध व्हा! अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देणं पडेल महागात, पालकांवर कारवाईची तरतूद

हद्दीतील गुन्हेगारांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी स्थानिक पोलिसांची गोपनीय पथके कार्यरत आहेत. रेकॉर्डवरील गुन्हेगार काय करतात, कोठे जातात, कोणासोबत असतात, याबाबतची इत्थंभूत माहिती संकलित करण्याचे काम पथकांकडून सुरू आहे. शहरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याबाबतचा नियमित आढावा घेतला जात आहे. दरम्यान, रेकॉर्डवरील गुन्हेगारांसोबत गोपनीय पथकांना काही नवीन चेहरेही दिसू लागले आहेत. सलग काही दिवस त्यांचा गुन्हेगारांसोबत वावर वाढल्याने पोलिसांनी त्यांची कुंडली काढली आहे. मात्र, संबंधितांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे समोर आले आहे. केवळ आकर्षण म्हणून ते रेकॉर्डवरील गुन्हेगारांसोबत फिरत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे.

सराईत गुन्हेगार एखाद्या गुन्ह्यात त्यांचा वापर करून घेण्याची भीती पोलिसांना आहे. त्यामुळे संबंधितांना पोलिस ठाण्यात बोलावून पोलिसांकडून त्यांचे समुदेशन सुरू आहे. गुन्हे शाखेची पथकेही त्यांना याबाबतचे धोके समजावून सांगत आहेत; तसेच, त्यांच्या पालकांनाही पोलिसांनी सूचित केले आहे. एकंदरीत नवख्या तरुणांना गुन्हेगारी विश्वात येण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे.

‘मुळशी पॅटर्न’चे वाढते आकर्षण

हिंजवडी आयटी परिसरात मुळशी खोऱ्यातील गुन्हेगारांचा छुपा वावर आहे. येथील आयटी कंपन्यांमधील कंत्राटे मिळण्यासाठी गुन्हेगारांची धडपड सुरू असते. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांनी ‘मुळशी पॅटर्न’च्या जोरावर अनेक कंत्राटे मिळवून माया गोळा केली आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील तरुणांना त्यांचे आकर्षण वाटत आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत सर्वाधिक म्हणजे ४१ तरुण कुख्यात गुंडांच्या संपर्कात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक पोलिसांकडे आहे. त्यापाठोपाठ भोसरी पट्ट्यातही तरुण पिढी गुंडांच्या संपर्कात आल्याची नोंद झाली आहे.

गुन्हेगारांशी मैत्री वाढल्याने नवख्या तरुणांकडूनही गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या संपर्कात नव्याने आलेल्या तरुणांचे समुपदेशन केले जात आहे. योग्य वेळी त्यांना दिशा देऊन गुन्हेगारीला पायबंद घालण्याचा आमचा प्रयत्न आहे. पोलिस आयुक्त विनायकुमार चौबे यांच्या सूचनेनुसार, हा उपक्रम राबवला जात आहे. आगामी काळात याचे सकारात्मक परिणाम दिसतील.

– कन्हैया थोरात, वरिष्ठ निरीक्षक, हिंजवडी पोलिस ठाणे

गुन्हेगारांच्या संपर्कातील तरुणांची ठाणेनिहाय संख्या

पिंपरी २२

भोसरी ३५

सांगवी ९

चिंचवड १४

निगडी १०

रावेत ४

तळेगाव ३५

तळेगाव एमआयडीसी १६

देहूरोड २४

शिरगाव ७

वाकड १३

हिंजवडी ४१

चाकण २६

म्हाळुंगे १६

आळंदी ११

दिघी ५

भोसरी एमआयडीसी ३४

चिखली १४

एकूण ३३६