लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘मटा कट्टा’ या उपक्रमाअंतर्गत उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी ‘मटा’ कार्यालयात भेट दिली. त्यावेळी त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीच्या प्रवासाबद्दल माहिती देतानाच विरोधकांकडून होणाऱ्या आरोपाला सडेतोड उत्तर दिले. त्याचवेळी उत्तर-पूर्व मतदारसंघातून आपला विजय पक्का असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. सध्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या मुलुंड येथे होणाऱ्या धारावीकरांच्या पुनर्वसनाबाबत सत्ताधाऱ्यांकडून केलेले दावे खोटे असल्याचे सांगत त्यांनी मुलुंड आणि आसपासची जागा हस्तांतरित केल्याचे पुरावेही सादर केले. सहा महिन्यांपूर्वी हा सर्व प्रकार सुरू असताना सत्ताधारी गप्प का होते, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
‘गेल्या सहा महिन्यांपासून यासंदर्भातील प्रक्रिया सुरू आहे. आज आचारसंहितेचे कारण देण्यात येते, पण ही सर्व प्रक्रिया आधीच सुरू आहे. येथील मुलुंड जकात नाक्याजवळची १८ एकर जागा, कांजुरमधील ४६ एकर जागा आणि इतर ६४ एकर जागेसह भांडुप, मुलुंड, विक्रोळी येथे २५६ एकर अशी आतापर्यंत ३२० एकर जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. तर प्रकल्पग्रस्तांसाठीची जागा ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर देण्यात आली असून अवघ्या १ रुपये दराने ही जागा देण्यात आली आहे. हा सर्व प्रकार सुरू असताना लोकप्रतिनिधी डोळे बंद करून होते. त्यानंतर आता वेगवेगळे दावे करीत आहे’, अशी टीका त्यांनी यावेळी केली. तर भांडुप, विक्रोळी, कांजूरच्या प्रकल्पग्रस्तांना आता माहुलमध्ये अतिशय हलाखीच्या परिस्थितीत ठेवण्यात आल्यावरून त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.
‘मिहीर कोटेचा नव्हे तर खोटेचा’
‘यंदाच्या निवडणुकीत संजय पाटील नावाशी साधर्म्य असलेले इतर अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. हा प्रकार आमच्याकडून करण्यात आल्याचा खोटा दावा महायुतीच्या उमेदवार मिहीर कोटेचा यांच्याकडून करण्यात येत आहे. हा डाव जर आमचा असता तर मी त्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास सांगितले असते. हा सर्व प्रकार कोटेचा यांनीच केला असून ते मिहीर कोटेचा नसून खोटेचा आहेत’, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. नावात साम्य असलेल्या उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र दाखविताना हे सर्व प्रतिज्ञापत्र एकाच पुरवठादाराकडून, एकाच दिवशी आणि एकाच व्यक्तीच्या नावावर असल्याचा पुरावा सादर करीत आपल्यावरील आरोप फेटाळून लावले.
मराठी-गुजराती वाद ठरवून केलेला
‘मी मराठी असून मला त्याचा अभिमान आहे. त्याचवेळी मी इतर धर्मांचाही तितकाच सन्मान करतो. इतर सर्व धर्मातील नागरिकांचा आशीर्वाद माझ्या मागे आहे. त्यामुळे मराठी-गुजराती वाद हा ठरवून करण्यात आला असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. तर त्याचवेळी आपल्या कुटुंबात आणि व्यवसायातील अनेक गुजराती-मारवाडी मित्र आहेत, हे विसरू नये, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
दगडफेकीचा कांगावा
‘आधी विरोधकांनी हिंदू-मुस्लिम मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर जाणीवपूर्वक पाकिस्तानच्या मुद्द्याला हात घातला. त्यानंतरही काही होत नाही, हे लक्षात आल्यानंतर दगडफेकीचा कांगावा करून मते मिळविण्याचा प्रयत्न कोटेचा यांनी केला. परंतु, हा कांगावा पोलिसांच्या अहवालात उघडा पडल्याचा दावा पाटील यांनी केला. तसेच कार्यकर्त्याला लागलेला दगड बाजूने जाणाऱ्या वाहनाच्या टायरमुळे उडून लागला असून या आरोपात काहीच तथ्य नाही’, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
‘मुलुंड टोलनाका बंद झाला पाहिजे’
खासदार म्हणून निवडून आल्यानंतर सर्वप्रथम मुलुंड येथील स्थानिक रहिवाशांना द्यावा लागणारा टोल बंद करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. मुंबईच्या लोकांकडून टोल कसा घेऊ शकता, याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला. तर मुलुंड आणि आसपासच्या परिसरातील डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तर आपण आतापर्यंत कोणती कामे केली, ही सर्व यादी आपण आपल्या सोशल मीडियावर उपलब्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.