मुलगी १५ फूट हवेत उडाली, आरोपी नशेत; जमावातला एक जण ओरडला; प्रत्यक्षदर्शीनं घटनाक्रम सांगितला

पुणे: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात आता एक प्रत्यक्षदर्शी समोर आला आहे. अपघाताच्या रात्री नेमकं काय काय घडलं त्याचा घटनाक्रम संकेत नावाच्या प्रत्यक्षदर्शीनं सांगितला आहे. अपघाताच्या रात्री पोर्शे कार अल्पवयीन आरोपीच चालवत होता, अशी माहिती त्यानं दिली. संकेतनंच आरोपी मुलाला पोलिसांच्या ताब्यात दिलं.

प्रत्यक्षदर्शी संकेतनं दिलेल्या माहितीनुसार अपघातावेळी पोर्शे कारचा वेग अतिशय जास्त होता. कारनं दुचाकीला दिलेली धडक इतकी जोरदार होती की आम्हाला काही कळलंच नाही. दुचाकीवरील मुलीचा जागीच मृत्यू झाला. ती माझ्यासमोर हवेत १५ फूट उंच उडाली. मुलाचं शरीर अक्षरश: छिन्नविच्छिन्न झालं होतं.
Pune Car Accident: सगळ्यांना उघडं पाडणार! अटकेनंतर ससूनच्या डॉक्टरची धमकी; पोर्शे प्रकरणात बडे मासे अडकणार?
कारच्या सगळ्या एअरबॅग्ज उघडल्या गेल्या होत्या. त्यामुळे आरोपींना घटनास्थळावरुन पळून जाता आलं नाही, असं संकेतनं सांगितलं. कारमध्ये अल्पवयीन आरोपीशिवाय आणखी दोन ते तीन जण होते. एअरबॅग्ज उघडल्यानं सगळे जण बाहेर आले होते. त्यानंतर जमावानं आरोपीला पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. मी आरोपीला पकडून ठेवलं. काही वेळात पोलीस तिथे पोहोचले. मग मी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलं.
Pune Car Accident: अगरवालची ‘ती’ मर्सिडीज जप्त, ससूनचा एक कर्मचारी फरार; पोर्शे प्रकरणात वेगवान घडामोडी
अपघातावेळी पोर्शे कार अल्पवयीन मुलगाच चालवत होता. तो मद्यधुंद अवस्थेत होता. तो इतका नशेत होता की जमावाकडून होणाऱ्या मारहाणीचा त्याच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. त्यानं जराही फरक पडत नव्हता. मी त्याला अपघातास्थळी घेऊन गेलो. तू काय केलंस ते बघ, असं मी त्याला सांगत होतो. पण तो शुद्धीत नव्हता, असं संकेतनं सांगितलं. जमाव मारहाण करत होता, तेव्हा तिथल्या कोणालाच आरोपीची ओळख माहीत नव्हती. पण तितक्यात गर्दीतून कोणीतरी ओरडलं, अरे हा तर अगरवालचा मुलगा आहे. ब्रह्मा रिऍलिटी बिल्डरचा मुलगा आहे. तेव्हा त्या आरोपीची ओळख पटली, असं घटनाक्रम संकेतनं सांगितला.

१९ मेच्या मध्यरात्री पुण्याच्या कल्याणीनगरात भरधाव पोर्शे कारनं दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील दोघांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. दोघेही पेशानं सॉफ्टवेअर इंजिनीअर होते. ते मूळचे मध्य प्रदेशचे रहिवासी होते. नोकरीसाठी ते पुण्यात राहत होते.