मुरलीधर मोहोळ जिंकले, तरी भाजप आमदारांचं टेन्शन वाढलं, पुण्याचे दोन आमदार डेंजर झोनमध्ये

पुणे: पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी १ लाख २३ हजार ३८ मतांनी विजय संपादित केला आहे. त्यांनी काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांचा पराभव केला आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी मुरलीधर मोहोळ यांनी शिवाजीनगर कसबा, कोथरूड, पर्वती या विधानसभा मतदारसंघांमध्ये मताधिक्य मिळवलं आहे. रवींद्र धंगेकर यांनी वडगाव शेरी आणि पुणे कॅन्टोन्मेंट या मतदारसंघांमध्ये मताधिक्य मिळवलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या दोन आमदारांच टेन्शन कमालीचं वाढलं आहे.

मुरलीधर मोहोळ यांना कोथरूड विधानसभा मतदार संघामधून तब्बल ७४ हजार २५७ मतांचे मताधिक्य मिळालं आहे. कोथरूडमध्ये मुरलीधर मोहोळ यांना १ लाख ४१ हजार ९२८ इतकी मतं मिळाली आहेत. तर, रवींद्र धंगेकर यांना ६७ हजार ६७१ इतकी मतं मिळाली आहेत. कोथरूड विधानसभा मतदारसंघावर भाजपचे एक हाती वर्चस्व राहिल. मात्र, जवळच असणाऱ्या शिवाजीनगर मतदारसंघांमध्ये मुरलीधर मोहोळ यांना केवळ ३ हजारांचं मताधिक्य मिळालं आहे. शिवाजीनगर मतदारसंघात भाजपचे सिद्धार्थ शिरोळे हे आमदार आहेत. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सिद्धार्थ शिरोळे यांनी काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांचा पराभव केला होता. अवघ्या ५ हजार १२४ मतांनी सिद्धार्थ शिरोळे यांचा विजय झाला होता.
Ajit Pawar: चेकमेट! ना शरद पवारांकडे परतू शकत, ना महायुतीत मुख्यमंत्री होऊ शकत, आता अजित पवार काय करणार?

लोकसभा निकलानंतर सिद्धार्थ शिरोळे टेन्शमध्ये

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला शिवाजीनगर मतदार संघातून मोठ मताधिक्य मिळण्याची आशा होती. कारण विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे त्यांनी तसे दावे प्रचारादरम्यान केले होते. मा,त्र शिवाजीनगर मतदार संघातून भाजपला ३ हजार ३३७ मतांचे मताधिक्य मिळालं. त्यामुळे सिद्धार्थ शिरोळे यांचे टेन्शन वाढलं आहे. दुसरीकडे, काँग्रेसने या ठिकाणी तगडी फाईट देत रवींद्र धंगेकर यांना ६४ हजार ११५ इतकी मतं मिळवली आहे. त्यामुळे आता अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये दत्ता बहिरट यांनी काँग्रेसकडून आपली दावेदारी जवळपास पक्की केली आहे. तर दुसरीकडे, पाच वर्ष आमदार असणाऱ्या सिद्धार्थ शिरोळे यांचा आलेख मात्र घसरताना दिसत आहे. अशातच आता भाजप नेतृत्व सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर पुन्हा विश्वास टाकणार की शिवाजीनगरमध्ये नवा चेहरा देणार यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये सुनील कांबळे डेंजर झोनमध्ये

पुणे लोकसभेमध्ये रवींद्र धंगेकर यांना वडगाव शेरी आणि पुणे कॅन्टोन्मेंटमध्येच मताधिक्य मिळालं आहे. पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये मुरलीधर मोहोळ यांना ६३ हजार २४६ इतकी मतं मिळाली आहेत. तर रवींद्र धंगेकर यांना ७६ हजार ५४३ इतकी मतं मिळाली आहेत. पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये भाजपचा आमदार असताना देखील काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना १३ हजार २९७ इतकं मताधिक्य मिळालं आहे. माजी मंत्री रमेश बागवे यांचा पराभव करत २०१९ मध्ये सुनील कांबळे यांनी अवघ्या ५ हजार १२ मतांनी बाजी मारली होती. मात्र, या लोकसभा निवडणुकीमध्ये सुनील कांबळे यांची झालेली पीछेहाट आणि कॅन्टोन्मेंट च्या मतदारांनी नाकारलेलं भाजपाचे चिन्ह यामुळे आता सुनील कांबळे यांचं टेन्शन वाढलं असून पुणे कॅन्टोन्मेंट या मतदारसंघातून कांबळे आता डेंजर झोनमध्ये आलेले आहेत.