मुख्यमंत्र्यांकडून राऊतांना ४ पानांची नोटीस, ३ दिवसांत माफीची मागणी, नाहीतर कारवाई करणार!

मुंबई : ‘राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान प्रत्येक मतदारसंघात २५ ते ३० कोटी रुपये वाटले. त्याचवेळी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एकही उमेदवार निवडून येऊ नये, यासाठी एकनाथ शिंदे यांनी कारस्थाने केली’, असे गंभीर आरोप शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला होता. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधून ‘रोखठोक’ या सदराखाली त्यांनी लेख लिहून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले होते. याचप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. केलेल्या आरोपांचे पुरावे द्या, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जा, असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी नोटिसीद्वारे राऊत यांना दिलाय.महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा धुरळा खाली बसल्यावर संजय राऊत यांनी २६ मे रोजी ‘सामना’मधून लोकसभा निवडणुकीदरम्यानच्या राजकारणावर भाष्य करणारा लेख लिहिला. या लेखातून त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लक्ष्य करताना निवडणूक काळात सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर करण्यात आल्याचा आरोप केला. गैरसंविधानिक बेकायदा मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात २५ ते ३० कोटी रुपये वाटल्याचा आरोप करून अजितदादांना एकही जागा मिळू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केल्याचा आरोप करून राऊत यांनी खळबळ उडवून दिली. याच आरोपांवरून मुख्यमंत्र्यांनी संजय राऊत यांना नोटीस पाठवली आहे.

एकनाथ शिंदे यांनी नोटिसीमध्ये काय म्हटलंय?

संजय राऊत यांचे हे आरोप दिशाभूल करणारे असून जनमाणसात माझी प्रतिमा मलिन करणारे आहेत. यातून त्यांना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला फायदा मिळवून द्यायचा आहे, असे सांगत माझ्यावरील आरोपाचे ३ पुरावे द्या नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जा, असे एकनाथ शिंदे यांनी नोटिसीतून म्हटले आहे.
राऊतांनी रोखठोकमधून अकलेचे तारे तोडले, हिंमत असेल तर.. गडकरींवरील वक्तव्यावरुन बावनकुळे संतापले

वकील चिराग शाह यांच्याद्वारे एकनाथ शिंदे यांनी राऊत यांना नोटीस पाठवली आहे. या ते म्हणतात, माझे अशील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २४*७ राजकारण आणि समाजकारणात सक्रीय असून जनमाणसांत त्यांचे स्थान मोठे आहे. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांतून त्यांच्या प्रतिमेला धक्का लावण्याचा प्रयत्न झाला. सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक म्हणून त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहेच, परंतु त्यांनी अधिकारांचे उल्लंघन केले असून म्हणूनच त्यांनी झालेल्या चुकीबद्दल माफी मागावी अन्यथा त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

संजय राऊत यांनी काय म्हटलंय?

५० खोके एकदम ओके… इसे कहते है उलटा चोर कोतवाल को डाटे… गैरसंविधानिक मुख्यमंत्री श्रीमान शिंदे ने हमे एक लिगल नोटीस भेजी है. very intresting and one of the funny political document.अब आयेगा मजा! जय महाराष्ट्र…..