मुंबई पदवीधरमध्ये विजय
मुंबई पदवीधर मतदारसंघात दीड लाखांच्या आसपास मतदार असून गेली ३० वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ कायम ठेवण्याचे ठाकरे यांच्या शिवसेनेपुढे मोठे आव्हान होते. यावेळी भाजपचे किरण शेलार यांच्यासाठी भाजपने मुंबईतील आपली सर्व यंत्रणा कामाला लावली. मात्र, त्यात त्यांना यश मिळू शकले नाही. अनिल परब २६ हजार ०१२ मतांनी विजयी झाले. परब यांचा विजय होताच ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. चारपैकी दोन फेऱ्यांतच अनिल परब यांनी जाहीर मतांचा कोटा गाठल्याने त्यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल केली होती.
मुंबई शिक्षक मतदारसंघातही बाजी
मुंबई शिक्षक मतदारसंघात पंचरंगी लढत झाली. या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अभ्यंकर, भाजपचे शिवनाथ दराडे, शिक्षक भारतीचे सुभाष मोरे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पुरस्कृत केलेले शिवाजी शेंडगे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी नलावडे हे पाच उमेदवार रिंगणात होते. यात अभ्यंकर यांनी बाजी मारली.
पोटनिवडणुकीत विजयी
दरम्यान, मुंबईवर ठाकरेंचा वरचष्मा असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. कारण विधानसभा, लोकसभा आणि विधानपरिषद अशा तीन प्रकारच्या निवडणुकात ठाकरे गटाने आघाडी घेतली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर झालेली पहिली निवडणूक होती ती अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची. भाजपने ऐनवेळी उमेदवारी मागे घेत ती बिनविरोध केली असली, तरी ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विजयी झाल्या.
लोकसभेतही धुव्वा
त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंनी लढवलेल्या चारपैकी तीन जागांवर त्यांना विजय मिळाला. अरविंद सावंत, अनिल देसाई आणि संजय दिना पाटील विजयी झाले. तर चौथ्या मतदारसंघातही शिवसेनेने निसटता विजय मिळवला. रवींद्र वायकरांनी ४८ मतांनी मिळवलेला विजय हा ठाकरे गटाकडून संशयाच्या फेऱ्यात आहे.
विधानसभा पोटनिवडणूक, लोकसभा आणि विधानपरिषद अशा तिन्ही निवडणुकीत ठाकरे गटाने मुंबईत विजय मिळवलेला असल्याने आगामी विधानसभा निवडणुका आणि महापालिका निवडणुकांत भाजप-शिवसेना महायुतीची धाकधूक वाढण्याची शक्यता आहे.