या समितीने नुकतीच मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली असता, अनेक ठिकाणी अद्याप रस्त्यांवर खड्डे आणि अपूर्ण कामे असल्याचे निदर्शनास आले. ही कामे पूर्ण होण्यासाठी डिसेंबर २०२५ किंवा मे २०२६ पर्यंतचा कालावधी लागेल, हे स्पष्ट दिसत असल्याचे जनआक्रोश समितीचे सचिव रूपेश दुर्गे यांनी सांगितले. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र देऊन महामार्गाच्या सद्यस्थितीकडे त्यांचे लक्ष वेधले आहे, तसेच या कामाला गती देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या काही ठिकाणांच्या पाहणीवेळीची सद्यस्थिती
पनवेल ते कासू (४२ किमी)- या टप्प्यातील कामाचे कार्यादेश २८ मार्च २०२३ ला दिल्यानंतर ३१ डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत दिली होती. एक मार्ग ३८ किमीपर्यंत पूर्ण झाला असला, तरी निष्कृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे. या टप्प्यात महामार्गावर खड्डे आहेत.
कासू ते इंदापूर (४२ किमी)- या टप्प्यातील कामासाठी ऑक्टोबर २०२२मध्ये कार्यादेश दिले. ३१ मे २०२४पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत होती. अद्याप या टप्प्याचा एक मार्ग झालेला नाही. कासू ते वाकण हा टप्पा महामार्ग नसून पायवाट झाला आहे. या टप्प्यातील सर्व उड्डाणपुलांचे काम बाकी आहे. कोलेटी ते नागोठणे हा १० किमी लांबीचा रस्ता अजून बाकी आहे.
इंदापूर ते वडपाले (२६.७५ किमी)- या टप्प्यात इंदापूर ते माणगाव दोन बायपास येतात. याचे काम ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण केले जाणार होते. मात्र दोन्ही बायपासची अवस्था बिकट आहे. धीम्या गतीने कामे सुरू आहेत. या कामामुळे माणगाव शहरात दररोज वाहनांच्या चार ते पाच किमीच्या रांगा लागत आहेत.
वडपाले ते भोगाव-(३८.७६ किमी)-या टप्प्यात दोन्ही बाजूचे काम अपूर्ण आहे. यामध्ये कशेडी ते दासगाव बोगदा सोडल्यास अद्याप बरेसचे काम अपूर्ण आहे.
आरवली ते वाकेड- या टप्प्यात ३५ टक्के काम झाल्याचे निदर्शास येते. उर्वरित कामे रखडलेली आहेत.
काही कामांना गती
मुंबई ते गोवा महामार्गाचे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्ण झाले असून रत्नागिरी जिल्ह्यात राजापूरमध्ये वाकेडपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. कशेळी ते परशुरामपर्यंतचा टप्पाही जवळपास पूर्ण झाला आहे. त्यात परशुराम ते अरवलीपर्यंत तीन-साडेतीन किमीचा भाग अपूर्ण आहे. आरवलीजवळील गडनदीवरील पूल पूर्ण झाला असून जोडरस्त्याची कामे अपूर्ण आहेत.