मुंबईसाठी २४ तास महत्त्वाचे, कोकणाला ऑरेंज अलर्ट, IMD चा हवामान अंदाज काय सांगतो?

मुंबई: मान्सून राज्यात दाखल झाल्यानंतर काही दिवस मुसळधार पाऊस कोसळला, त्यानंतर पावसाने ब्रेक घेतला आणि पुन्हा जोरदार पावसाचं आगमन झालं. आतातरी राज्यात अपेक्षित पाऊस होइल अशी अपेक्षा असताना पाऊस पुन्हा गायब झाला. राज्यात काही ठिकाणी पावसाने दडी मारली असली तरी मुंबई-पुणे, कोकणात पुन्हा जोरदार पावासाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी थांबून थांबून का होईना पण हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसतोय. तर, मुंबईत आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावलेली आहे.

मुंबईत ढगाळ वातावरण

मुंबईत पुढील २४ तास ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावासाचा इशारा देण्यात आला आहे. यादरम्यान मुंबईतील कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

कोकणाला पावसाचा ऑरेंज अलर्ट

त्याशिवाय, आज दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित कोकणातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पावासाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दोन दिवसात मान्सून राज्य व्यापणार

अरबी समुद्रात मान्सून सक्रिय होत असून पुढील दोन दिवस महत्त्वाचे असल्याची माहिती आहे. पुढील दोन दिवसात राज्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरीत आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, मुंबई, ठाणे, पुणे, साताऱ्यात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी हकल्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याशिवाय, विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.