मुंबईवर लक्ष, दिग्गज नेते दक्ष; मोदी-शहा ते पवार-ठाकरे, पाचव्या टप्प्यासाठी दिग्गजांची फौज

मुंबई : मुंबईसह राज्यातील १३ मतदारसंघांसाठी २० मे रोजी मतदान होणार असून, त्यासाठी प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील अनेक नेत्यांनी मुंबई गाठण्यास सुरुवात केली असून, आजपासून मुंबई, ठाण्यात प्रचारतोफा धडाडतील.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे नेते चौथ्या टप्प्याच्या प्रचाराच्या रणधुमाळीत सहभागी झाले होते. आता २० मे रोजी पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा आणि धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे अशा १३ मतदारसंघासाठी निवडणुका होत आहेत. या मतदारसंघासाठी एकूण २६४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, यात अनेक दिग्गज नेते आपले नशीब अजमावत आहेत. या उमेदवारांच्या निमित्ताने जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे भवितव्यही पणाला लागले असल्याने राज्यासह राष्ट्रीय पातळीवरील दिग्गज नेत्यांची फौज आता मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लवकरच मुंबईत सभेसाठी येणार असून, भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे राज्यातील नेते मुंबईत ठाण मांडणार असल्याचे समजते. काँग्रेसकडून राहुल गांधी, प्रियांका गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हेसुद्धा मुंबईतील मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि जयंत पाटील हे भिंवडी आणि इतर मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगण्यात आले. महायुतीत सामील झालेले अजित पवार हे मुंबईतील कोणत्या उमेदवारांसाठी प्रचार करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Nashik Lok Sabha : अजितदादांचा फोन आणि कोकाटे नरमले, गोडसेंबाबत कडवटपणा दूर, माणिकराव महायुतीच्या प्रचारात
मुख्य म्हणजे, शिवसेना (उबाठा) पक्षाचा मुंबईतील प्रचार कशा पद्धतीने होतो, याकडे सर्वांचे लागले आहे. उद्धव ठाकरे यांचे चार शिलेदार मुंबईतील मतदारसंघात उभे आहेत. त्यामुळे ठाकरे मुंबईत किती सभा घेतात, याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत. त्यांच्या सोबतीला आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्याशिवाय पक्षाचा कोणता बडा नेता पक्षाच्या प्रचारात सहभागी होतो, याबाबत उत्सुकता आहे.
Sharad Pawar : छुपी भेट समजली आणि अजितदादांनी दम भरला, पुण्यात ‘त्या’ माजी नगरसेवकाचा शरद पवारांना पाठिंबाRead Latest Maharashtra News Updates And Marathi News

रंगीत तालीम

मुंबईवर लक्ष केंद्रित करण्यासाठी दिग्गज नेते सरसावले असून, त्याचे प्रतिबिंब रविवारच्या प्रचारात उमटले. काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते शशी थरुर यांना प्रचाराच्या रणधुमाळीत उतरविण्यात आले. वर्षा गायकवाड यांच्या प्रचारासाठी त्यांनी ‘रोड शो’ केला. दुसरीकडे, भाजपकडून राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना मैदानात उतरविण्यात आले. त्यांनी मुंबईत राजस्थानी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने प्रचाराची धुरा सांभाळली.