मुंबईत हिट अँड रन; वरळीत कारनं दाम्पत्याला उडवलं, फरफटत नेलं, महिलेचा मृत्यू

मुंबई: पुण्यातील पोर्शे कार अपघाताची घटना ताजी असताना आता मुंबईत हिट अँज रनचा प्रकार घडला आहे. मासे खरेदी करुन घरी परतणाऱ्या दाम्पत्याला पहाटेच्या सुमारास कारनं उडवलं. मुंबईतील वरळीमध्ये ही घटना घडली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालक फरार झाला. त्याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. या अपघातानं परिसरात खळबळ उडाली आहे.

वरळीतील प्रसिद्ध ऍट्रिया मॉलजवळ हिट अँड रनची घटना घडली आहे. ऍट्रिया मॉलजवळ असणाऱ्या वरळी कोळीवाडा परिसरात वास्तव्यास असणारं कोळी दाम्पत्य सकाळी मासांच्या लिलावासाठी ससून डॉकला गेलं होतं. मासे घेऊन ते घरी परतत होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला एका कारनं मागून धडक दिली. दाम्पत्याकडे बरंच सामान होतं. त्यामुळे दुचाकी चालवत असलेल्या पतीचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि दोघेही कारच्या बोनेटवर पडले.

पतीनं प्रसंगावधान राखत बोनेटवरुन बाजूला उडी घेतली. मात्र महिलेला तसं करता आलं नाही. अचानक घडलेल्या प्रकारामुळे कार चालक घाबरला. त्यानं कारचा वेग वाढवला. त्यानं बोनेटवर पडलेल्या महिलेला फरफटत नेलं. अपघातात पती थोडक्यात बचावला. पण महिलेला गंभीर इजा झाली. तिला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. गाडीखाली चिरडल्यानं महिलेचा मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालक पळून गेला. त्याचा शोध सुरु आहे. त्यासाठी परिसरातील सीसीटीव्हींची मदत घेतली जात आहे.