उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे मिहिर कोटेचा यांनी पहिल्याच दिवशी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज सादर केला होता. मात्र, यावेळी महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची अनुपस्थिती होती. त्यामुळे त्याचीच अधिक चर्चा झाली. आता आज, सोमवारी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अर्ज सादर करणार आहेत. यावेळी महायुतीचे बडे नेतेही उपस्थित राहून एकजूट दाखवतील, अशी चिन्हे आहेत. मुंबईतील शिवसेनेचा पहिलाच उमेदवार अर्ज सादर करणार असल्याने पक्षाकडून ताकद दाखवण्याची मोठी तयारी सुरू आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई आणि दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडूनही जय्यत तयारी करण्यात आली आहे. शक्तिप्रदर्शनासाठी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
शक्तिप्रदर्शनाची शिवसेनेची रणनीती; महायुतीची एकजूट?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडूनही जय्यत तयारी
दोन्ही पक्षांना अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र वेळ
दोन पक्ष, दोन बाजू
सत्तासंघर्षानंतर अनेकवेळा शिवसेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अनेक पदाधिकारी आमने सामने उभे आहेत. त्यानंतर आता अर्ज सादर करण्याच्या निमित्ताने होणाऱ्या शक्तिप्रदर्शनातही ही वेळ येणार असून याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाने मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सीएसटीएम परिसराची बाजू ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी जहांगीर कला दालनाजवळ जागा देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्याशिवाय दोन्ही पक्षांसाठी वेळही वेगवेगळी देण्यात आल्याची माहिती प्रशासनाने यावेळी दिली आहे.
मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त
मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करताना कोणत्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग करण्यात आले असून सर्व कार्यकर्त्यांना एशियाटिक ग्रंथालयाजवळच थांबविण्यात येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सोमवारी याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोस्तही ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.