दिवसभरात कल्याण, डोंबिवली तसेच नवी मुंबई परिसरात तुरळक ठिकाणी ४० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस नोंदला गेला. मुंबई आणि परिसरात गुरुवारी आणि शुक्रवारी झालेल्या पावसामुळे पावसाच्या सरासरीमध्ये वाढ झाली आहे. मुंबई शहरामध्ये शुक्रवारपर्यंतच्या सरासरीपेक्षा ३८ टक्के, तर मुंबई उपनगरामध्ये ४० टक्के तूट नोंदवली गेली. ही तूट मंगळवारपर्यंत ५० टक्क्यांहून अधिक होती. पालघरमध्ये आत्तापर्यंतच्या सरासरीपेक्षा १५ टक्के पाऊस कमी झाला आहे, तर ठाणे जिल्ह्यात ही तूट १६ टक्के आहे. या सरींमुळे धरणक्षेत्रातील पाण्याची चिंता कमी होण्याची आशा मुंबईकरांना आहे.
रायगड, रत्नागिरीला ‘ऑरेंज अलर्ट’
राज्यात रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना मंगळवारपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सिंधुदुर्गातही सोमवारपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यात शनिवारपासून घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सातारा जिल्ह्यातही सोमवारी आणि मंगळवारी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून घाट परिसरात तुरळक ठिकाणी अती मुसळधार पाऊस पडू शकतो.
उर्वरित मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात पुढील चार दिवसांमध्ये खूप पावसाची शक्यता नाही. मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. या काळात वाऱ्यांचा वेग ४० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरामध्ये वाढलेल्या पावसामुळे महाराष्ट्राची पावसाची सरासरी सुधारली आहे.