मुंबईत मविआ आणि महायुतीच्या प्रचारतोफा धडाडणार, पंतप्रधानांच्या उपस्थितीत महायुतीची सभा

प्रतिनिधी, मुंबई : लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा येत्या सोमवारी पार पडणार आहे. या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांत मतदान होणार आहे. या टप्प्यातील प्रचाराची सांगता शनिवारी होणार असून तत्पूर्वी आज, शुक्रवारी मुंबईत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रचारतोफा धडाडणार आहेत. दादर येथील शिवाजी पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुतीची सभा होणार आहे. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहभागी होणार आहेत. तर महाविकास आघाडीची सभा बीकेसी येथील मैदानात होणार आहे. या सभेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत.मुंबईतील सहा मतदारसंघांसह ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, नाशिक, धुळे आणि दिंडोरी या मतदारसंघांत २० मे रोजी मतदान होणार आहे. शनिवारी संध्याकाळी प्रचाराची सांगता होईल. तत्पूर्वी शुक्रवारी महायुती आणि महाविकास आघाडीकडून मतदारांना गळ घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठीच महायुती आणि महाविकास आघाडीकडून या टप्प्यातील अंतिम सभांचे आयोजन करण्यात आले असून जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे.
मोठी बातमी! मध्य रेल्वेवर पंधरा दिवसांचा ब्लॉक; काही ट्रेन्स रद्द, तर काही उशिराने, पाहा वेळापत्रक

शिवाजी पार्क येथे होणाऱ्या महायुतीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रमुख वक्ते असणार आहेत. राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दर्शविला असल्याने त्यांची उपस्थितीही असेल. राज्यातील सत्तासंघर्षानंतर पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे हे राजकीय व्यासपीठावर प्रथमच एकत्र असणार आहेत. त्यामुळे या सभेत दोघे काय बोलणार, महाविकास आघाडीवर या दोन तोफा कशा धडाडणार, याची उत्सुकता मतदारांमध्ये आहे. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले हेदेखील उपस्थित राहणार आहेत.

महाविकास आघाडीतर्फे बीकेसी येथील मैदानात प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. अनेक दिवसांपासून महायुतीकडून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आले आहे. त्यामुळे बीकेसीच्या सभेत ठाकरे या आरोपांना नेमके काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याशिवाय मराठीच्या मुद्द्यावरही भाष्य करण्यात येते का, याबाबत उत्सुकता आहे.

उमेदवारांकडून होणार शक्तिप्रदर्शन

मुंबईतील सहाही मतदारसंघांतील महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार या सभांत उपस्थित राहणार आहेत. या उमेदवारांकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी या मतदारसंघांतील उमेदवारही या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

अजित पवार यांची उपस्थिती

काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे अनुपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील रोड शोलासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही मोठा नेता उपस्थित नसल्याने या चर्चेत आणखी भर पडली. मात्र शुक्रवारी होणाऱ्या महायुतीच्या सभेत अजित पवार उपस्थित राहणार आहेत, असे पक्षातर्फे जाहीर करण्यात आले.

बॅनर आणि झेंड्याची गर्दी

या सभांच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. शिवाजी पार्कपासून बीकेसीपर्यंत सगळीकडे मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. या सभेला विक्रमी गर्दी जमविण्याचाही प्रयत्न असणार आहे. शिवाजी पार्क आणि आसपासच्या परिसरात अनेक प्रमुख नेत्यांचे कटआऊट लावले आहेत.