मुंबईत मलेरिया, डेंग्यू, लेप्टो रोखण्यासाठी बीएमसीची खास मोहीम; ‘या’ ठिकाणी होतेय कारवाई

मुंबई : पावसाळा सुरू झाल्यानंतर मलेरिया, डेंग्यू, लेप्टो यांसारखे आजार मोठ्या प्रमाणात पसरतात. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग व कीटकनाशक विभागाने मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत मलेरिया, डेंग्यू पसरवणाऱ्या डासांची तीनशेपेक्षा अधिक उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यात येत आहेत. तसेच मलेरिया व डेंग्यू परसवण्यासाठी कारणीभूत ठरत असलेल्या पाच हजारपेक्षा जास्त आस्थापनांना पालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

जानेवारीपासून एप्रिलपर्यंत मुंबईतील विविध भागांमध्ये करण्यात आलेल्या कारवाईंतर्गत मलेरियाचा फैलाव करणाऱ्या ॲनाफिलिस डासांची ३ हजार ३६१ तर डेंग्यूचा फैलाव करणाऱ्या एडिस डासांची ३३ हजार ७३६ उत्पत्तीस्थळे नष्ट केली. यामध्ये सर्वाधिक ठिकाणे ही झोपडपट्टी परिसरातील होती. तसेच अशी ठिकाणे आढळणाऱ्या ५ हजार २५२ आस्थापनांना मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस पाठविण्यात आली आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या कीटकनाशक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. पालिका आयुक्तांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने व कीटकनाशक विभागाने एक कृती आराखडा तयार केला आहे.
केरळला वेस्ट नाइलचा ताप; ‘ या’ तीन जिल्ह्यांत आरोग्य विभागाकडून अलर्ट जारी, काय आहेत लक्षणं?
‘या’ ठिकाणी होते कारवाई

मुंबई महानगरपालिकेच्या कृती आराखड्यानुसार कचरा टाकण्याच्या जागा, राडारोडा, टायर, ट्युब, भंगार ठेवलेल्या जागा, पाण्याच्या टाक्यांचा परिसर घरातील सजावटी फुलदाण्या, झाडांमधील पाणी, पिंप या ठिकाणी साचणाऱ्या पाण्यामध्ये डासाची उत्पत्ती होते. त्यामुळे ही ठिकाणे नष्ट करण्यासह कोठेही पाणी साचू न देण्यासाठी कीटकनाशक विभागाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.