प्रतिनिधी, मुंबई : महापालिकेने उद्या, बुधवारी अंधेरी पूर्व आणि पश्चिम, विलेपार्ले, जोगेश्वरी या मोठ्या परिसरासाठी मुख्य जलवाहिन्या जोडणी व जुनी नादुरुस्त जलवाहिनी काढून टाकण्याच्या कामासाठी काही भागात पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कामामुळे या परिसरातील पाणीवितरण व्यवस्थेत सुधारणा होईल, असा दावा करण्यात आला आहे. या भागांसाठी वेरावली जलाशयातून पाणी सोडले जात असून पाणी सोडतेवेळी तेथील पाण्याची आवश्यक पातळी १.२ मीटर असल्यास कपात असतानाही सर्व भागांना पुरेसा पुरवठा होतो. ती राखल्यास जलवाहिनी बदलाचा हेतू साध्य होईल असे, नागरिकांचे म्हणणे आहे.पाणीकपात, तसेच इतर वेळेसही या भागात पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत असल्याने पालिकेच्या जलवाहिनी बदलाच्या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे. ‘वेरावली जलाशय १ आणि २ येथील पाण्याची पातळी सायंकाळी पाच वाजता १.२ मीटर इतकी असल्यास अंधेरी पूर्व येथील कोलडोंगरी जम्बो दर्शन तसेच विलेपार्ले पूर्व विभागात इतर ठिकाणी पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होतो. पाणीकपातीच्या दिवसात नेमके हे गणित चुकते. वेरावली येथील पाणीपातळी सायंकाळी पाच वाजता कधी १ मीटर तर अनेकदा ०.८ मीटर एवढी खाली असते. त्यामुळे प्रत्यक्षात पाणीकपात पाच ते दहा टक्के असली तरी जलाशयातील कमी पातळीमुळे निर्माण होणाऱ्या कमी दाबामुळे सर्वच भागात पुरेसे पाणी पोहोचत नाही. प्रत्यक्षात पाणीकपात २५ ते पासून ५० टक्क्यांपर्यंत जाते’, अशी माहिती येथील भाजपचे माजी नगरसेवक अभिजीत सामंत यांनी दिली.
जिथे फुटलेल्या पक्षांचे उमेदवार, तिथे पाठ फिरवून बसले मतदार; घटलेल्या टक्क्याचा फुटीशी संबंध?
या भागात पाणीबाणी
के पूर्व विभाग : विशाल सभागृह, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकरवाडी, बिमा नगर, पंथकी बाग, तेली गल्ली, हाजी जुमान चाळ, कोळ डोंगरी, जीवा महाले मार्ग, साई वाडी, जीवन विकास केंद्र, शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान नगर, श्रद्धानंद मार्ग, नेहरू मार्ग, तेजपाल मार्ग, शास्त्री नगर, आंबेडकर नगर, काजूवाडी, विलेपार्लेचा बहुतांश भाग (पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ५ ते रात्री ८) पाणीपुरवठा बंद राहील.
पंप हाउस, विजय राऊत मार्ग, पाटीलवाडी, हंजर नगर, झगडापाडा, पारसी वसाहत, जिजामाता मार्ग, गुंदवली हिल, आशीर्वाद चाळ (पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ५ ते रात्री ८) पाणीपुरवठा बंद राहील.
जुना नागरदास मार्ग, मोगरपाडा, नवीन नागरदास मार्ग, पारसी पंचायत मार्ग, आर. के. सिंग मार्ग, निकोलसवाडी परिसर (पाणीपुरवठ्याची वेळ रात्री ८ ते रात्री १०.३०) पाणीपुरवठा बंद राहील.