मुंबईत कोसळधार! रात्रभराच्या जोरदार पावसाने रेल्वे रुळांवर पाणी, लोकलसेवा विस्कळीत

मुंबई: गेले काही दिवस दडी मारलेल्या पावसाने मुंबईसह उपनगरात दमदार हजेरी लावली आहे. मुसळ मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. रात्रभर झालेल्या दमदार पावसामुळे अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही ठिकाणी लोकल धीम्या गतीने सुरु आहेत. त्यामुळे पहाटे पहाटे चाकरमान्यांना मोठा मतस्ताप सहन करावा लागला आहे.

  • मध्य रेल्वेवर कर्जत-खोपोली, कसाऱ्याकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल या फक्त ठाण्यापर्यंत सुरु असून पुढे रद्द करण्यात आल्या आहेत.
  • भांडुप स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी साचलं आहे त्यामुळे मध्य रेल्वेला फटका बसला आहे.
  • कुर्ला-मानखुर्द स्थानकातही रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
  • वडाळा येथेही पाणी भरल्याने गोरेगाव-सीएसएमटी लोकल पुढील सुचनेपर्यंत पूर्ण बंद करण्यात आल्या आहेत.

गेल्या पाच तासात (१२ ते ५ वाजेपर्यंत) मुंबईत मुसळधार

ठिकाण किती एमएम पाऊस?
सांताक्रूझ १६१
चेंबूर १५७
मिरा रोड १५१
मुलुंड १४३
विलेपार्ले १३८
शीव १३५
दहिसर १२८
गोरेगाव, माटुंगा, वडाळा १२५
मरोळ १२४
कांदिवली, अंधेरी १२०
भांडुप, भायखळ ११५
कुर्ला, मरिन ड्राईव्ह १०१
दादर ९६
कोपरखैरणे ८१

पुढील ३-४ दिवस राज्यात जोरदार पाऊस

पुढील ३-४ दिवसांत राज्यात आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ८ जुलै ते १० जुलै या कालावधीत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

शनिवार-रविवारीही मुसळधार पाऊस

शनिवारपासून मुंबईसह उपगरांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली आहे. रविवारी देखील काही ठिकाणी लोकलसेवेवर परिणाम झाला होता. रुळांवर झाड पडल्याने मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कसारा ते टिटवाळा स्थानकांदरम्यानची लोकल सेवा बंद करण्यात आली होती.

कल्याण ते कसारा दरम्यान रुळांवर डोंगराची माती येणे आणि ओएचईचा आधार देणारा खांब झुकल्याची घटना घडली. पनवेल-कळंबोली परिसरातील रुळ पाण्याखाली गेल्याने लोकल फेऱ्यांसह मेल-एक्स्प्रेस वेळापत्रकही वाहून गेल्याचे दिसून आले.

कल्याण-कसारा मार्गावरील खडवली, तानशेत, वाशिंद, आटगाव परिसरात शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. मध्यरात्री अडीच-तीन वाजण्याच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. पाच तासांत सुमारे १११ मिमी पावसाची नोंद रेल्वे स्थानक परिसरात झाली आहे. पनवेल-कळंबोली रेल्वे परिसरात पाच तासांमध्ये १२० मिमी पाऊस पडला, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी सांगितले.

पनवेल-कळंबोली रेल्वे परिसरात अतिमुसळधार पावसाची नोंद झाल्याने नाले-ओढे भरून वाहू लागले. रेल्वे यार्डसह संपूर्ण परिसर जलमय झाल्याने अनेक ठिकाणी रुळांखालील खडी ही वाहून गेले होते. यामुळे सकाळी साडे दहा ते दुपारी साडे बारादरम्यान रेल्वे वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आली. पावसाचा जोर कमी झाल्यावर वेगमर्यादेसह धीम्या गतीने वाहतूक सुरू करण्यात आली.