मुंबईतील कॉलेजमध्ये प्रवेशाचा घोळ; यादीत नाव असूनही विद्यार्थ्यांना धक्के मारुन बाहेर काढले

मुंबई : दहावीच्या निकालानंतर ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत पसंतीच्या कॉलेजमध्ये पहिल्या यादीतच नाव आले, परंतु त्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला गेल्यावर अक्षरश: धक्के मारून बाहेर काढले… अशीच वेळ आली खार एज्युकेशन सोसायटीच्या (केईएस) कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी गेलेल्या विद्यार्थी आणि पालकांवर! कॉलेजने प्रवेश प्रक्रिया बंद केली असून कोणालाही प्रवेश मिळणार नाही, असा पवित्रा कॉलेज प्रशासनाने घेतला. विशेष म्हणजे त्यासाठी कॉलेजची इमारत धोकादायक झाली असून संपूर्ण कॉलेज आणि शाळा बंद करणार असल्याचे कारण दिले गेले.

इयत्ता अकरावी आणि प्रथम वर्षासाठीच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या कॉलेजचा प्राधान्यक्रम द्यायचा असतो. खार-वांद्रे परिसरात राहणाऱ्या अनेकांनी खार एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजचे नाव पहिल्या क्रमावर दिले होते. त्यापैकी यादीत नाव आलेले विद्यार्थी व त्यांचे पालक शनिवारी व सोमवारी कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी पोहोचले असता अकरावी व प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया बंद केली आहे, असे सांगत त्यांना परत पाठवण्याचा प्रयत्न सुरक्षारक्षकांनी केला. मात्र, यादीत नाव आल्याने कॉलेज प्रशासनाची किंवा प्राचार्यांची भेट घेऊ द्या, अशी मागणी पालकांनी करताच सुरक्षारक्षकांनी त्यांना अक्षरश: हाकलून दिले.

याबाबत ‘केईएस’च्या प्रशासनाची भेट घेण्यास गेल्यावर सुरक्षारक्षकांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही आत जाण्यास आडकाठी केली. तसेच प्रवेशद्वारावर लावलेल्या पत्राची प्रत दाखवण्यात आली. या प्रकरणी ‘केईएस’च्या प्रशासन व विश्वस्तांशी फोन, एसएमएस, व्हॉट्सअप मेसेज अशा सर्व पद्धतीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, काहीही प्रतिसाद मिळाला नाही.

… म्हणून प्रवेश बंद!

या पत्रानुसार ‘केईएस’ची इमारत धोकादायक परिस्थितीत असून या इमारतीची संरचनात्मक तपासणी झाली आहे. या तपासणीत इमारत धोकादायक असल्याचे सिद्ध झाल्याने संस्थेने नवीन प्रवेश थांबवल्याचे म्हटले आहे. तसेच सध्या सुरू असलेले वर्ग इतरत्र हलवण्यात अडचण येत असून सध्या संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनीही इतरत्र प्रवेश घेण्यासाठी हालचाली कराव्यात, असे सुचवले आहे.

‘आम्हाला हाकलून दिले’

आम्ही वांद्रे येथे राहतो आणि माझ्या भावाने या कॉलेजचा पर्याय दिला होता. त्याचे नाव यादीत आल्याने आम्ही प्रवेश प्रक्रियेसाठी गेलो. मात्र, आम्हाला प्रवेशद्वारावरच अडवले. प्रवेश प्रक्रिया बंद असल्याचे सांगितले. मात्र काहीही कारण दिले नाही. आम्हाला अक्षरश: धक्के मारून हाकलून दिले. – आविष्कार पवार, वांद्रे
CUET UG CBT: पुढील वर्षी सीयुईटी परीक्षा पूर्णपणे ऑनलाइन होणार? २०२४ चा निकाल यायला खूप वेळ लागेल
मुलांनी काय करायचे?

माझ्या मुलीचे नाव या यादीत आल्याने आम्ही प्रवेश घेण्यासाठी गेलो. मात्र प्रवेश प्रक्रिया बंद असल्याचे सांगण्यात आले. आमची पहिली पसंती या कॉलेजला असल्याने दुसऱ्या यादीत आम्हाला प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे आता तिसऱ्या यादीपर्यंत थांबण्याशिवाय पर्याय नाही. मुलांनी अशा परिस्थितीत काय करायचं? – तिलकराम गुप्ता (पालक)

कॉलेज बंद पाडण्याचा डाव!

खार एज्युकेशन ट्रस्टची इमारत अगदी सुस्थितीत आहे. आम्ही आत जाऊनही पाहणी केली. प्रशासन म्हणते तशी धोकादायक स्थिती असल्याचे कोणालाही जाणवणारही नाही. गुजरातीभाषिक अल्पसंख्याक असलेली ही शाळा आणि कॉलेज प्रशासनास बंद पाडायचे आहे आणि त्या जागी इंटरनॅशनल स्कूल उभारायचे आहे. – अखिल चित्रे, सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना