मुंबईच्या डबेवाल्यांनी आपली सेवा दिनांक १७ जुलै आणि १८ जुलै रोजी बंद ठेवली आहे. मंगळवार दिनांक १६ जुलै रोजी दिवसभर डबेवाले काम करणार आहेत आणि रात्री वाहनाने पंढरपूरला रवाना होणार आहेत. बुधवारी, १७ जुलै रोजी एकादशी निमित्ताने शासकीय सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे त्या दिवशी डबेवाले पांडूरंगाचे दर्शन घेतील आणि गुरुवारी, १८ जुलै रोजी द्वादशीचा उपवास पंढरपुरात सोडतील व मुंबईच्या दिशेने रवाना होतील.
शुक्रवारी, १९ जुलै रोजी डबेवाले नेहमी प्रमाणे कामावर हजर राहणार आहेत. मुंबईच्या डबेवाले शेकडो वर्षापासून ही वारीची परंपरा जपत आले आहेत. दरवर्षी ते सुट्टी घेऊन पंढरपूरला पांडूरंगाच्या दर्शनाला जातात. डबेवाल्यांच्या अनुपस्थितीमुळे काही ग्राहकांची आता गैरसोय होणार आहे त्या बद्दल मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे.
पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र’ योजना लागू केल्या बद्दल आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभारी आहोत. या निर्णयामुळे लाखो वारकऱ्यांना शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे, असेही सुभाष तळेकर यांनी म्हटले आहे.
‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र’ योजनेअंतर्गत लाखो वारकऱ्यांना शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल.