मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट! मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत १७ टक्केच साठा शिल्लक

प्रतिनिधी, मुंबई: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये गेल्या वर्षीच्या २३ टक्के पाणीसाठ्याच्या तुलनेत यंदा फक्त १७ टक्के साठा उरला आहे. त्यामुळे तूर्त पाणीकपातीचा मुंबई महापालिकेचा विचार नसला तरी मेअखेरीस पाणीसाठ्याचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुंबई महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा या सात तलावांतून मुंबईला पाणीपुरवठा होतो. या तलावांची पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे. या तलावांतून दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. वाढलेला उकाडा पाण्याची वाढती मागणी आणि तलावांतील पाण्याचे होणारे बाष्पीभवन यांमुळे तलावांतील पाणीपातळी कमी होत आहे.

आपत्कालीन परिस्थितीसाठी अप्पर वैतरणा आणि भातसामध्ये राखीव साठाही कायम असतो. हा साठा उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकार निर्णय घेते. उपलब्ध तलावांतील पाणीसाठा खूप कमी झाल्यानंतरच राखीव कोट्यातील पाणीसाठ्याचा वापर केला जातो. सात तलावांतील कमी झालेल्या पाणीसाठ्याचा आढावा घेण्यासाठी मार्च आणि एप्रिलमध्येही मुंबई महापालिका मुख्यालयात उच्चस्तरीय बैठका झाल्या होत्या. आता मे अखेरीसही ही बैठक होऊन पाणीकपातीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. गेल्या वर्षीही मे महिनाअखेरीस पाणीसाठ्याचा आढावा घेऊन जूनच्या पहिल्या आठवड्यात दहा टक्के पाणीकपात करण्यात आली होती.

जलसाठ्यात मोठी घट

सध्या सात तलावांत एकूण २ लाख ५३ हजार ८९१ दशलक्ष लिटर म्हणजेच १७ टक्के पाणीसाठा आहे. २०२३ मध्ये २३ टक्के आणि २०२२ मध्ये २६.४८ टक्के साठा होता. २०२३ च्या आधीच्या दोन वर्षांत ऑक्टोबरपर्यत पाऊस पडल्याने पाण्याचा वापर होऊनही पाणीसाठा फारसा कमी होत नव्हता. २०२३ मध्ये ऑक्टोबरच्या आधीच पावसाने राज्यातून माघार घेतल्याने त्याचा परिणाम आता पाणीसाठ्यावर होऊ लागला आहे.

मोठ्या तलावांतील पाणीसाठा खूपच कमी

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा हे सर्वांत मोठे तलाव आहेत. मात्र, या तलावांतील पाणीसाठाही बराच कमी झाला आहे. भातसा तलावातील पाणीसाठ्याची क्षमता ७ लाख १७ हजार ३७ दशलक्ष लिटर आहे. मात्र, या तलावांत १५ टक्केच पाणीसाठा आहे. अप्पर वैतरणाचीही पाणीसाठा क्षमता २ लाख २७ हजार ४७ दशलक्ष लिटर असून, सध्या १४ टक्के पाणीसाठा, तर मध्य वैतरणाची १ लाख ९३ हजार ५३० दशलक्ष लिटर पाणीसाठवण क्षमता असूनही केवळ ११ टक्के साठाच शिल्लक आहे.

उर्वरित चार तलावांतील साठा (टक्क्यांमध्ये)

मोडक सागर- २२ टक्के

तानसा-३४.२८ टक्के

विहार- ३० टक्के

तुळशी- ३६ टक्के