मुंबईकरांना आणखी सहज आणि सोप्या पद्धतीने आता बीएमसीकडे खड्ड्याची तक्रार करता येणार आहे. यामध्ये सोशल मिडिया, मोबाईलवरुन टोल फ्री नंबर आणि माय बीएमसी अॅप याचा समावेश असेल.तसेच जर तुम्ही तक्रार दाखल केली तर अगदी तक्रार केल्यानंतर साधारणपणे २४ तासांच्या आत संबंधित अभियंत्यांनी व कंत्राटदाराद्वारे खड्डे बुजविण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.यासह मुंबईतील नागरिकांना पावसाळ्याच्या कालावधीत कोणत्याही गैरसोईंना सामोरे जावे लागू नये म्हणून खड्डेमुक्त रस्त्यांचे उद्दिष्ट ठेवून काम करावे, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनीसुद्धा दिले आहेत.
कशी करता येणार तक्रार
‘MyBMC Pothole FixIt’ हे बीएमसीने ॲप तयार केले आहे. मोबाईलमध्ये ॲप सुरु करुन जीपीएस ऑन करुन रस्त्यावरील खड्डय़ाचे छायाचित्र काढून तुम्हाला ते अपलोड करायचे आहे. ज्यामुळे रस्त्यावर नेमक्या कोणत्या ठिकाणी खड्डा आहे ? या विषयीची माहिती संबंधित अधिकार्यांपर्यंत जाईल.ॲपमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर तक्रारदारास विशिष्ट तक्रार क्रमांक मिळेल. तक्रार क्रमांकाच्या आधारे ॲपमध्ये सर्च केल्यास तक्रारीविषयी सद्यस्थिती तक्रारदारास लगेच दिसू शकते. तक्रार प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिकेच्या संबंधित अभियंता/ कंत्राटदाराद्वारे खड्डा भरण्याची आणि रस्ता व्यवस्थित करण्याची कार्यवाही त्वरित केली जाईल आणि सुधारणा केल्याचे फोटो ॲपमध्ये अपडेट केले जाते. ज्यामुळे तक्रारदारास त्याने केलेल्या तक्रारीचे निराकरण झाल्याची खात्री होईल.
याव्यतिरिक्त बीएमसीच्या हद्दतील रस्त्यांवरील खड्डे किंवा दुरूस्तीयोग्य रस्त्यांविषयक तक्रार करायची असल्यास ‘१९१६’ (One Nine One Six) दूरध्वनी क्रमांकावर तक्रार करता येईल.हा टोल फ्री क्रमांक २४ तास चालू असणार आहे. यासह @mybmc ‘एक्स’ (ट्वीटर) अकाऊंटला टॅग करुन सुद्धा तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रार नोंदवता येईल.