काम ७८ दिवसांत पूर्ण करण्यात आले
अंधेरी परिसराला पूर्व आणि पश्चिम जोडणारा वाहतुकीसाठी महत्वाचा दुवा असलेल्या गोखले पुलाच्या उंचीशी समांतर पातळीवर सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूल जोडणीच्या दृष्टीने नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले होते. त्यानुसार तांत्रिक सल्लागाराच्या देखरेखीखाली सर्व कामे मुदतीत पूर्ण करण्यात येत आहेत. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग एका बाजूला १ हजार ३९७ मिलीमीटर आणि दुसऱ्या बाजूला ६५० मिमी वर उचलण्यात आला आहे. या जोडणीच्या कामासाठी दोन महिन्यांपासून नियोजन सुरू होते. हे काम ७८ दिवसांत पूर्ण करण्यात आले.
उच्च दर्जाच्या काँक्रीट तंत्रज्ञानाचा वापर
पुलावरील काँक्रीटच्या मजबुतीकरणासाठी आवश्यक १४ दिवसांचा अवधी देण्यात आला होता. त्यासाठी उच्च दर्जाच्या काँक्रीट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. मजबुतीकरणाबरोबरच समांतर अशा पद्धतीने जोडणी सांध्याचे कामही पूर्ण करण्यात आले. त्यानंतर पुलावरून विशिष्ट तासांच्या कालावधीत वाहनांना घेऊन चाचणी करण्यात आली. या पुलावर जुहूपासून अंधेरी असा पश्चिम-पूर्व प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका वाहतुकीसाठी सुरळीत आणि सुरक्षित असल्याचे ‘व्हीजेटीआय’मार्फत घोषित करण्यात आले आहे. आवश्यक चाचण्या यशस्वी झाल्यानंतर या मार्गिकेवर वाहतूक सुरू करण्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र ‘व्हीजेटीआय’ने ३० जूनला महापालिकेला दिले. त्यानंतर ४ जुलैला पश्चिम-पूर्व मार्गिका वाहतुकीसाठी सुरू केली जाणार आहे.
पुलावरील सर्व चाचण्या यशस्वी
आव्हानात्मक काम ७८ दिवसांत पूर्ण
अंधेरी पूर्व- पश्चिम प्रवास आता सुकर
हलक्या वाहनांना प्रवेश
गोखले पुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम सध्या रेल्वे भागातील हद्दीत सुरू आहे. त्यामुळे बर्फीवाला आणि गोखले पुलावर फक्त हलक्या वाहनांना प्रवेशासाठी मुभा देण्यात आली आहे. अवजड वाहनांसाठी उंचीरोधक (हाईट बॅरिअर) बसविण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर अवजड वाहनांनाही प्रवेश देण्यात येणार आहे.
पूल सुस्थितीत
बर्फीवाला पुलासाठी देण्यात आलेला तात्पुरत्या स्वरूपाचा जँकचा आधार काढण्यात आला आहे. त्यामुळे बर्फीवाला पूल पूर्णपणे खांबाच्या आधारावर सुस्थितीत असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या पूल विभागाने दिली. कोणताही तात्पुरता आधार पुलाला देण्यात आलेला नाही. मुख्य पुलाच्या दक्षिण भागातील काम जलदगतीने सुरू आहे. हे काम पूर्ण करताना बर्फीवाला पुलास दक्षिण मार्गिका जोडली जाईल, याची दक्षता घेतली जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. परिणामी, या भागातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होणार आहे.