ए विभागातील कुलाबा परिसरात कॅप्टन प्रकाश पेठे मार्गापासून मोहिमेस सुरुवात झाली. त्यानंतर सी विभागातील मुंबादेवी मंदिर परिसरात अग्यारी गल्ली येथे भेट देऊन आयुक्तांनी मोहिमेत सहभाग घेतला. एच पश्चिम विभागात वांद्रे पश्चिम येथील लीलावती रुग्णालय परिसर, एच पूर्व विभागात सांताक्रूझ पूर्वेस प्रभात कॉलनी, एल विभागात साकी विहार रस्ता, एस विभागात हिरानंदानी जंक्शन या ठिकाणी आयुक्तांनी पाहणी केली, तसेच मोहिमेबाबत योग्य ते निर्देश दिले. स्वच्छता कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या दैनंदिन कामकाजाची पद्धती, वेळ, कामातील अडीअडचणींची माहितीही आयुक्तांनी घेतली.
सार्वजनिक स्वच्छता हे महापालिकेचे प्राथमिक कर्तव्य असून ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मुंबई स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी सुरू असलेले हे अभियान हे फक्त नावलौकिकासाठी नव्हे, तर त्याहून जास्त सार्वजनिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. या मोहिमेला लोकचळवळीमध्ये रूपांतरित करण्यासाठी महापालिकेने सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. ही मोहीम यापुढेदेखील सातत्याने व जोमाने सुरू राहील, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली. या मोहिमेसाठी मनुष्यबळ, संसाधने, धोरण सुधारणा यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. अधिकारी, अभियंते, सफाई कामगार, साहित्यसामग्री, यंत्रणा नियोजनबद्ध व पूर्ण कार्यक्षमतेने उपलब्ध करून दिले जात आहेत.
प्रक्रियाकृत पाण्याचा वापर
मोहिमेसाठी प्रक्रिया केलेले पाणी (रिसायकल वॉटर) वापरात येते. पाण्याची नासाडी होत असल्याच्या दाव्यामध्ये काहीही तथ्य नाही. महापालिकेकडे मोठ्या प्रमाणावर ‘रिसायकल वॉटर’ उपलब्ध आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.
काँक्रिटीकरणाच्या कामांना प्राधान्य
दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळापूर्व कामे वेगाने सुरू आहेत. या कामांचा विभागवार आढावा घेतला असून यंत्रणांना योग्य ते निर्देश दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित केली आहे. विविध शासकीय विभागांसोबत तसेच इतर प्राधिकरणांसोबत बैठका घेऊन त्यांना आवश्यक ते निर्देश दिले आहेत. रस्त्यांच्या सिमेंट-काँक्रिटीकरणाची सुरू असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, यावर भर दिला जात आहे, असे आयुक्तांनी सांगितले.
अधिक मनुष्यबळ तैनात करावे
राडारोडा, बांधकाम साहित्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी, सखल भागातील पाणी निचरा करण्यासाठी पंप कार्यान्वित रहावेत याकडे लक्ष द्यावे, मुंबईकरांना भेडसावणाऱ्या समस्या मार्गी लावण्यासाठी अधिकाधिक यंत्रणा आणि मनुष्यबळ तैनात करावे, असे निर्देश महापालिकेने संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.