मीही आई, पत्नी, आजी; माझं कुटुंब सुरक्षित असेल तर..ठाकरेंची साथ सोडल्यानंतर यामिनी जाधव म्हणाल्या..

मुंबई : दक्षिण मुंबईतील महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनच्या ‘मटा पत्रकार परिषद’ या विशेष कार्यक्रमात सहभागी होत उद्धव ठाकरेंनी न दिलेली साथ, नरेंद्र मोदींच्या कामाचा लेखाजोगा, एकनाथ शिंदेचा साधेपणा, रविंद्र वायकर यांनी केलेलं विधान ते ईडी अशा अनेक गोष्टींवर त्यांनी भाष्य केलं.रविंद्र वायकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी मटा कट्टा या कार्यक्रमात बोलताना, पक्षप्रवेश करताना माझ्यापुढे दोनच पर्याय आहेत, एकतर तुरुंगात जाणं किंवा पक्षबदल करणं. शेवटी मला जड अंतकरणाने पक्ष बदलाचा निर्णय घ्यावा लागला, असं विधान केलं होतं. यामिनी जाधव यांनीही जड अंतकरणाने उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या गटात प्रवेश केला का? असा सवाल त्यांना करण्यात आला. यावेळी बोलताना यामिनी जाधव यांनी मी जड अंतकरणाची बाई नसल्याचं म्हटलं.
Yamini Jadhav : आरोप सिद्ध होईपर्यंत आम्ही निर्दोषच, ठाकरेंना सोडल्याचा पश्चाताप नाही, यामिनी जाधव यांच्या भावना
याबाबत बोलताना यामिनी जाधव म्हणाल्या, उद्धव ठाकरेंनी आम्हाला हा आदेश दिला, की तुमची लढाई तुम्ही लढा. मी आमदार म्हणून, शिवसैनिक म्हणून काम करते. पण त्याआधी मी पत्नी, आई, आजी, सासू आहे. माझं कुटुंब मला आहे. ज्यावेळी माझं कुटुंब सुरक्षित असेल, त्यावेळी इतर माझ्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाची जबाबदारी घेऊ शकते. त्यांना सुरक्षित करू शकते. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी दिलेला तुमची लढाई तुम्ही लढा हा आदेश आम्ही पाळला आणि आता आम्ही आमच्या पद्धतीने लढतोय. आम्हाला वाटलं शिंदेंच्या या उठावात सामील व्हावं, आम्ही उठावात सामील झालो.

माझ्यासारख्या महिला आमदाराला त्यांची भेट मिळत नव्हती. माझे काही प्रश्न होते. अडीच वर्षांचं काम माझं पाहिलं, तर सर्वात कमी निधी मिळालेली आमदार मी आहे. फक्त २२ कोटी निधी मला मिळाला होता. २२ कोटींमध्ये मी लोकांना सांभाळत होती. आता उद्धव ठाकरेंनी दिलेला निर्णय आहे, त्यांनी दिलेला तो शेवटचा आदेश आहे, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंनी साथ सोडल्याचं सांगत शिंदेंच्या उठावात सामील झाल्याचं म्हटलं.