मीडियाशी जास्त बोलू नको, दिलीप वळसे पाटलांचा सल्ला, रोहित पवार यांचं खोचक उत्तर

मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून त्यानिमित्ताने विविध पक्षांच्या नेते आमदारांच्या गाठीभेटी विधिमंडळ परिसरात होत असतात. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांची भेट विधानमंडळ परिसरात झाली. यावेळी प्रसारमाध्यमांशी जास्त न बोलण्याचा सल्ला वळसे पाटील यांनी रोहित पवार यांना दिला. रोहित पवार यांनी भेटीत वळसे पाटील यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूसही केली.

राज्याचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून विधिमंडळाच्या कामकाजासाठी गुरुवारी दिवसभर आमदारांना विधिमंडळ परिसरात, सभागृहात यावे लागले आहे. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलैला (शुक्रवारी) मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे. अशातच रोहित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांची भेट झाली.
Ajit Pawar: दादांनी काँग्रेसच्या निवडणूक रणनीतीकाराकडे दिली विधानसभेची जबाबदारी; ९० दिवसांचा प्लान ठरला

…तसेही अधिवेशनात आम्हाला फार बोलू दिले जात नाही!

रोहित, मीडियाशी जास्त बोलू नको, ते अडचणीत आणतात, असा सल्ला वळसे पाटील यांनी दिला. त्यांच्या सल्ल्यावर रोहित पवार यांनीही खोचक उत्तर दिले. मी पत्रकारांशी गप्पा मारत होतो, जे बोलायचे तेच मी त्यांच्याशी बोलतो. तसेही अधिवेशनात आम्हाला फार बोलू दिले जात नाही, असे रोहित पवार म्हणाले. त्यांच्या उत्तरावर वळसे पाटील यांनी स्मितहास्य केले.
Vidhan Parishad Election : मतदान गुप्त पद्धतीने, त्यामुळे घोडेबाजाराची शक्यता, मविआ की महायुती? कार्यक्रम कुणाचा होणार?

रोहित पवार यांच्याकडून वळसे पाटलांच्या तब्येतीची विचारपूस

पाय घसरून पडल्याने लोकसभा निवडणुकीच्या काळात वळसे पाटील यांच्या हात आणि पायांना इजा झाली होती. पुण्यातील रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सध्या काठीचा आधार घेऊन त्यांना चालावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी वळसे पाटील यांची आत्मियतेने विचारपूस केली. तुमचा पाय बरा आहे का? काठीच्या आधाराशिवाय चालता येणे शक्य आहे का? असे विचारित तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहनही रोहित यांनी केले.

वळसे पाटलांच्या मतदारसंघांत शरद पवारांच्या सभेची हवा

राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर आश्चर्यकारकरित्या दिलीप वळसे पाटील यांनी अजितदादांसोबत जाणे पसंत केले. त्यानंतर शरद पवार यांनी आंबेगावमध्ये जाऊन दिलीप वळसे पाटील यांना पराभूत करण्याचे आवाहन तेथील जनतेला केले. दत्तात्रेय वळसे पाटील यांनी माझ्याबरोबर काम केले. पण वडिलांच्या पाच टक्केही निष्ठा त्यांच्या वारसदारांत नाही. त्यांना विधानसभेचे अध्यक्षपद देऊ केले, विविध खात्याचे मंत्री केले पण असे असूनसुद्धा त्यांनी विश्वासघात केला, अशी बोचरी टीका पवार यांनी केली होती.