‘मिहीर शहा हा सराईत गुन्हेगाराप्रमाणे’, पोलिसांनी सांगितले अंगावर शहारे येणारे कारनामे

प्रतिनिधी, मुंबई : वरळी येथील हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर राजेश शहा याचे अपघातापासून अटकपर्यंतचे कारनामे एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. अपघातानंतर तो चालकाच्या जागेवरून बाजूला गेला, पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी दोन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी पलायन, पोलिस पोहोचू नयेत, यासाठी मोबाइल बंद आणि विशेष म्हणजे आपल्याला कुणी ओळखू नये यासाठी दाढी मिशी काढली, केसही कापले असे पोलिस तपासातून समोर आले आहे. विशेष म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्सही त्याच्याकडे सापडले नसून ओळख पटेल असे काहीच त्याने स्वतःजवळ ठेवले नव्हते.वरळी येथे भरधाव बीएमडब्ल्यू कार चालवून मिहीर आणि त्याच्यासोबत असलेला चालक राजऋषी बिडावत यांनी दुचाकीवरील नाखवा दाम्पत्याला धडक दिली. कावेरी नाखवा यांना सुमारे दीड किलोमीटर फरफटत नेल्याने त्यांचा मृत्यू झाला तर प्रदीप नाखवा हे जखमी झाले. रविवारी पहाटे झालेल्या या अपघातानंतर वडिलांच्या सांगण्यानुसार मिहीरने कारचा ताबा राजऋषी याच्याकडे दिला. वरळी, वांद्रे, गोरेगाव, बोरिवली, येऊर, शहापूर, विरार असा दोन दिवस पळ काढत अटक टाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लूक आऊट नोटीस जारी केली होती त्यामुळे आपल्यावर कुणाची नजर पडू नये यासाठी त्याने केस कापले, दाढी-मिशी काढली. पोलिसांनी त्याला पडकले त्या वेळी त्याच्याकडे ना मोबाइल होता ना कोणतीही ओळखपत्र होती. ड्रायव्हिंग लायसन्स असल्याचे मिहीर सांगत आहे; मात्र ते अद्याप सापडले नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मुसक्या आवळेपर्यंत मिहीरने केलेले हे कारनामे एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्याला याबाबत कुणी मार्गदर्शन करीत होते का, याबाबतही चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Worli Hit And Run Case : हिट अँड रन प्रकरणातील पिडितेच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाखांची मदत

बोरिवली ते गोरेगाव व्हाया मरिन ड्राइव्ह

मिहीर शहाला अटक केल्यानंतर पोलिसांनी घटनाक्रम जाणून घेण्यासाठी मिहीरला पुन्हा त्याच्या घरापासून कारमधून फिरवले. बोरिवली येथून मरिन ड्राइव्ह, तेथून वरळी येथील अपघातस्थळी, तेथून वांद्रे आणि गोरेगाव येथील मैत्रिणीच्या घरापर्यंत नेले. प्रत्येक ठिकाणी त्याने नेमके काय केले हे पोलिसांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. घटनाक्रम, पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब यांची सांगड घालण्यासाठी अपघाताचा सीन पुन्हा घडविला जाण्याची शक्यता असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

मिहीर आणि राजऋषीच्या माहितीत तफावत

अटकेनंतर मिहीर देत असलेली माहिती आणि राजऋषी याने जबाबात सांगितलेली माहिती यात तफावत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे नेमकी माहिती जाणून घेण्यासाठी दोघांची समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार आहे, असेही पोलिसांनी म्हटले आहे. गोरेगाव ते विरार या दोन दिवसांपेक्षा अधिकच्या कालावधीत मिहीर याने नेमके काय केले याचीही माहिती जाणून घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न असेल.