मिहीर शहा प्रचंड प्यायला होता, पण…; पोलिसांच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती उघड

मुंबई: वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहीर शहाच्या अटकेनंतर धक्कादायक गोष्टी उघड होऊ लागल्या आहेत. मिहीर शहाने आपल्या आलीशान BMW कारने नाखवा दाम्पत्याला चिरडलं. यामध्ये कावेरी नाखवा यांचा कारसोबत फरफटत गेल्याने मृत्यू झाला तर त्यांचे पती प्रदीप नाखवा हे जखमी झाले. आतापर्यंत मिहीर शाहने दारु प्यायली नसल्याची माहिती होती. पण, तो गाडी चालवत असताना प्रचंड प्यायला असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो खूप दारु प्यायलेला होता, त्या व्हिस्कीचे तब्बल १२ पेग प्यायचे होते.

मुंबई पोलिसांच्या सूत्रांनुसार, जेव्हा हा अपघात झाला तेव्हा आरोपी मिहीर शाहला हे माहिती होतं की त्याच्या गाडीखाली काहीतरी अडकलेलं आहे.

नेमकं काय घडलं?

रविवार (७ जुलै) पहाटे नाखवा दाम्पत्य हे मासे खरेदी करुन आपल्या दुचाकीने वरळी येथील घराकडे निघाले होते. तेव्हा शिवसेना नेता राजेश शहा यांचा २४ वर्षीय मुलगा मिहीर शहा याने त्याच्या बीएमडब्ल्यू कारने नाखवा दाम्पत्याच्या दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये कावेरी नाखवा या गाडीच्या बोनटमध्ये अडकल्या तर त्यांचे पती प्रदीप नाखवा हे बाजुला फेकले गेले, त्यानंतर मिहीरने कावेरी यांनी दोन किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. त्यानंतर वरळी सी-लिंकजवळ त्याने गाडी थांबवली आणि कावेरी यांनी बोनटमधून बाहेर काढलं, त्यानंतर ड्रायव्हरने स्टेअरिंग हाती घेतलं आणि पुन्हा कावेरी यांच्या अंगावर गाडी घातली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

मृत कावेरी नाखवा यांचे पती प्रदीप नाखवा यांनी आरोप केला आहे की, मिहीरने मुद्दाम कावेरी यांना फरफटत नेलं, ते वारंवार मिहीरला गाडी थांबवण्यास सांगत होते, ओरडत होते पण तो ऐकला नाही.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या रात्री मिहीरने बियरच्या चार कॅन मालाड येथून घेतल्या, त्याने दारुचे एकूण १२ पेग रिचवले. शनिवारची रात्र असल्याने तो जॉयराईडसाठी निघाला होता, जुहू ते बोरिवली ते मरिन ड्राईव्ह अशी लाँग ड्राईव्ह करुन तो परतत होता, अशीही माहिती पोलिसांनी दिली. शहा यांचा ड्रायव्हर राजऋषी बिदावत जो अपघातावेळी गाडीतच उपस्थित होता, त्याला पोलिसांनी रविवारी अटक केली. त्याच्यावर मिहीरला फरार होण्यास मदत केल्याचा आरोप आहे. कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर, मिहीर शहाला कोर्टाने १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.