मिहिर शाह आणि मित्र मंडळींनी व्हिस्कीचे १२ लार्ज पेग मारले, बारबाहेर पडल्यावर ४ तासांनी…

मुंबई : वयाची २५ वर्ष पूर्ण केली नसतानाही वरळीतील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शाह याला हार्ड ड्रिंक्स पुरवणाऱ्या जुहू येथील व्हाईस-ग्लोबल तापस बारचा परवाना महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाने निलंबित केल्यानंतर बीएमसीनेही येथील बेकायदेशीर भागाचे पाडकाम केले.

बारवर कारवाई

पालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा बार २०२२ मध्ये उघडण्यात आला. १९ जुलै रोजी उपनगर जिल्हाधिकाऱ्यांसमोर या प्रकरणाची पुढील सुनावणी होईपर्यंत बारचा परिसर सील करण्यात आला आहे, असे उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी सांगितले.

बीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांना तळ मजल्यावर सुमारे १५०० चौरस फूट मोकळी जागा परवानगीशिवाय वापरली जात असल्याचे आढळले, तर टेरेसचे सुमारे २००० चौरस फूट क्षेत्र लोखंडी शेडने झाकलेले आहे.
Worli Hit and Run : नरकातल्या राक्षसाहून बेकार हिट अँड रन, मिहिर शाहला कोळीवाड्यात सोडून द्या : आदित्य ठाकरे

व्हिस्कीचे १२ मोठे पेग

एक्साईज विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी केलेल्या आरोपानुसार बारच्या बिलाच्या आधारे, मिहिर आणि त्याच्या मित्रांनी व्हिस्कीचे १२ मोठे पेग म्हणजे साधारण प्रत्येकी चार पेग त्या रात्री रिचवले. हे प्रमाण पाहता कोणीही आठ तास नशेच्या अधीन होऊ शकते, असेही ते म्हणाले.

मिहिर आणि त्याचे मित्र पहाटे दीड वाजता बारमधून बाहेर पडले आणि हा अपघात पहाटे पाच वाजता झाला, म्हणजेच नशेच्या अंमलाखाली असल्याच्या चार तासांच्या आत. बीएमडब्ल्यू चालवत असलेल्या मिहिरने दुचाकीस्वार नाखवा दाम्पत्याला धडक दिली, ज्यात कावेरी यांना फरफटत नेल्याने त्यांचा मृत्यू झाला.
Dombivli Woman Suicide : आईला शेवटचा कॉल, मोबाईलमध्ये सुसाईड नोट, डोंबिवलीत नवविवाहितेची आत्महत्या, पोलीस नवऱ्यासह सासूला अटक

सराईत गुन्हेगाराप्रमाणे वर्तन

दरम्यान, आरोपी मिहीर राजेश शहा याचे अपघातापासून अटकेपर्यंतचे कारनामे एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे असल्याचे पोलिसांनी म्हटले. अपघातानंतर तो चालकाच्या जागेवरून बाजूला हटला, पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी त्याने दोन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी पलायन केले, तर पोलिस आपल्यापर्यंत पोहोचू नयेत, यासाठी त्याने मोबाईलही बंद ठेवला. विशेष म्हणजे आपल्याला कुणी ओळखू नये यासाठी त्याने दाढी मिशीही कापली, केसही कट केले, असे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्सही त्याच्याकडे सापडले नसून ओळख पटणारी कुठलीच खूण त्याने स्वतःजवळ ठेवली नव्हती.