विधान परिषदेच्या ११ सदस्यांची मुदत २७ जुलै रोजी संपत आहे. या रिक्त होऊ घातलेल्या जागांसाठी १२ जुलैला मतदान होत आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. भाजपच्या पाच, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन, तर काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येकी एक उमेदवाराने उमेदवारी या दिवशी अर्ज दाखल केला.
ठाकरेंकडून अचानक नार्वेकरांना उमेदवारी
महाविकास आघाडीने सुरुवातीला दोन जागा लढवण्याची तयारी केली होती. यापैकी एक जागा काँग्रेस, तर दुसऱ्या जागेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना (उबाठा) शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा देतील, असे ठरले होते. मात्र, शिवसेना (उबाठा) पक्षाने सोमवारी रात्री नार्वेकर यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सावध झाले आहेत.
निवडून आणण्यासाठी ६९ मतांची गरज
लोकसभेवर झालेली निवड, आमदारांचे राजीनामे आणि सदस्यांचे निधन, यांमुळे विधानसभेचे संख्याबळ सध्या २७४ इतके आहे. परिणामी विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी मतांचा कोटा कमी होऊन २३ वर आला आहे. विधानसभेत काँग्रेसचे ३७, शिवसेना (उबाठा) पक्षाचे १५ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे १३, असे एकूण ६५ आमदार आहेत. क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख ठाकरे गटासोबत आहेत. त्यामुळे आघाडीचे संख्याबळ ६६ पर्यंत जाते. आघाडीला आपले तिन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी ६९ मतांची गरज असल्याने आणखी तीन मतांसाठी समाजवादी पक्ष, एमआयएम, कम्युनिस्ट पक्ष हे छोटे पक्ष, तसेच अपक्ष आमदारांवर भिस्त असणार आहे.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटून पक्षाचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे काँग्रेस यावेळी आपल्या उमेदवारीसाठी २३ पेक्षा जास्त मतांचा कोटा निश्चित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शप) आणि शिवसेना (उबाठा) पक्षाला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी अतिरिक्त मतांची तजवीज करावी लागू शकते.
मनिषा कायंदेंना उमेदवारी नाकारली
दरम्यान, शिवसेनेने मावळत्या आमदार मनिषा कायंदे यांना पुन्हा उमेदवारी नाकारली आहे. भाजपच्या आग्रहामुळे लोकसभा निवडणुकीत तिकीट कापावे लागलेल्या भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना यावेळी संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने परभणीतील नेते राजेश विटेकर आणि पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांना उमेदवारी दिली आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
कोणाकोणाचे अर्ज दाखल
भाजप : पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत
शिवसेना : भावना गवळी, कृपाल तुमाने
काँग्रेस : डॉ. प्रज्ञा सातव
शिवसेना (उबाठा) : मिलिंद नार्वेकर
राष्ट्रवादी काँग्रेस : राजेश विटेकर, शिवाजी गर्जे
शेकाप : जयंत प्रभाकर पाटील