मान्सूनच्या उत्तरार्धात पाऊस वाढण्याचा अंदाज, ऑगस्टमध्ये ‘ला निना’ विकसित होण्याचे संकेत

प्रतिनिधी, पुणे : प्रशांत महासागरात ‘एल निनो’ची स्थिती संपून ‘न्यूट्रल’ स्थिती निर्माण झाल्याचे अमेरिकी हवामानशास्त्र संस्था नोआने नुकतेच जाहीर केले. महासागराचे तापमान आणखी कमी होऊन येत्या ऑगस्टमध्ये तिथे ‘ला निना’ विकसित होण्याची शक्यता सर्वाधिक आहे, असे ‘नोआ’च्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने (सीपीसी) म्हटले आहे.

मान्सूनच्या उत्तरार्धात पाऊस वाढण्याचा अंदाज

प्रशांत महासागराचे तापमान कमी झाल्याचे निरीक्षणही नोंदवण्यात आले आहे. ‘सीपीसी’ने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिनाभरापासून पूर्व प्रशांत महासागराचे तापमान सरासरीच्या दरम्यान आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये तयार झालेली ‘एल निनो’ची स्थिती जाऊन न्यूट्रल स्थिती तयार झाल्याची ही चिन्हे आहेत. प्रशांत महासागरामध्ये जुलैपर्यंत न्यूट्रल स्थिती राहण्याची शक्यता ६० टक्के असून, ऑगस्टमध्ये ‘ला निना’ विकसित होण्याची शक्यता ६५ टक्के आहे. उत्तर गोलार्धातील हिवाळ्यापर्यंत प्रशांत महासागरात ‘ला निना’ची स्थिती कायम राहू शकते.

‘ला निना’ म्हणजे काय?

विषुववृत्तीय प्रशांत महासागराचे तापमान सरासरीच्या ०.५ अंशांपेक्षा सलग तीन महिने जास्त असेल तर त्या स्थितीला एल निनो; तर याच्या विरुद्ध स्थितीला ला निना म्हणतात. एल निनो काळात देशात बहुतेक वर्षी अपुरा पाऊस, तर ला निना असताना देशात बहुतेक वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होतो असे आकडेवारी सांगते. ‘ला निना’मुळे यंदा मान्सूनच्या उत्तरार्धात जास्त पावसाची शक्यता असून, हंगामातील एकूण पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज ‘आयएमडी’ने वर्तवला आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

पावसाचे प्रमाण कमी होणार

येत्या चार ते पाच दिवसांमध्ये मान्सून विदर्भाच्या आणखी काही भागांमध्ये पोचून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता असल्याचे ‘आयएमडी’ने म्हटले आहे. मात्र, या काळात हवामान अनुकूल नसल्याने कोकण वगळता राज्याच्या इतर भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात पुढील काही दिवस कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता नसल्याने येत्या आठवड्यात राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता नाही.