सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या बैठकीत मतदारसंघनिहाय चर्चा झाली. विदर्भ, मराठवाडा, मुंबई-कोकण विभागात झालेल्या पराभवाची कारणमिमांसा करण्यात आली. यात तीन गोष्टी प्रामुख्यानं मांडण्यात आल्या आहेत. दुरावलेले ओबीसी मतदार, वॉशिंग मशीन म्हणून विरोधकांनी केलेला प्रचार आणि मुंबईत झालेली पिछेहाट यावर बैठकीत चर्चा झाली.
ओबीसी मतदारांची पाठ
मनोज जरांगे पाटलांचं आरक्षणासाठी सुरु असलेलं आंदोलन आणि मराठा असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्याची केलेली हाताळणी भाजपसाठी धोकादायक ठरली. त्यामुळे ओबीसी मतदार भाजपपासून दुरावला, यावर भाजप नेत्यांच्या बैठकीत चर्चा झाल्याचं वृत्त द हिंदूनं दिलं आहे. १९८० पासून भाजपनं ओबीसींचा विचार करुन राज्यात माधव पॅटर्न राबवला. या माध्यमातून माळी, धनगर आणि वंजारींना आपल्याकडे वळवण्यात भाजप यशस्वी ठरला.
मराठ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाचा फटका भाजपला बसला. जरांगेंच्या आंदोलनाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या मराठवाड्यात भाजपला भोपळा मिळाला. चार जागांवर त्यांचा पराभव झाला. जालना, बीड यासारख्या सुरक्षित जागांवर भाजपचा धुव्वा उडाला. तर विदर्भात विरोधकांचा संविधान बचावचा प्रचार भाजपला महागात पडला. ओबीसी दुरावल्याचा फटका भाजपला बसला.
वॉशिंग मशिनचा प्रचार भोवला
दोन पक्ष फोडून त्यांच्यासोबत युती करण्याचा निर्णय, युतीत झालेली अजित पवारांची एन्ट्री यावरही भाजपच्या बैठकीत चर्चा झाली. संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्नगायझरनं अजित पवारांना सोबत घेतल्यानं भाजपचा ब्रँड डॅमज झाल्याचं लेखात म्हटलेलं असताना भाजपच्या बैठकीतही हा मुद्दा चर्चिला गेला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं ४ जागा लढवल्या. त्यातील केवळ १ जागा जिंकली.
भाजप वॉशिंग मशिन असल्याची टीका विरोधकांनी केली. विरोधी पक्षातील नेता भाजपसोबत गेल्यावर त्याच्यावर असलेले भ्रष्टाचाराचे डाग धुतले जातात, असा प्रचार विरोधकांनी केला. त्याचा फटका भाजपला बसल्याचं वरिष्ठांना कळवण्यात आलं. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना एकत्र काम करताना अडचण येत नाही. कारण दोन्ही पक्षांची विचारधारा सारखीच आहे. पण अजित पवारांच्या पक्षाबद्दल ती अडचण येते. कार्यकर्त्यांना त्यांचा प्रचार करणं जड जातं, या गोष्टी केंद्रीय नेतृत्त्वाला सांगण्यात आल्या.