माऊली निवांत राहा! आता वारकऱ्यांसाठी आपला दवाखाना, आरोग्य विभाग देणार सुविधा; यंदाची वैशिष्ट्ये

प्रतिनिधी, पुणे : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय सुविधा देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व पालखी मार्गावर डॉक्टरांसह सहा हजार ३६८ वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर एक या प्रमाणे २५८ तात्पुरत्या स्वरूपात ‘आपला दवाखा’न्याची सुविधा करण्यात आली आहे. पालखी मार्गावर २४ तास रुग्णवाहिका तैनात असणार आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. पुणे परिमंडळ आणि पुणे जिल्हा परिषदेतर्फे पालखी मार्गावर चार आरोग्य पथके रुग्णवाहिकेसह पालखी परतेपर्यंत कायम सोबत राहणार आहेत.

इतक्या औषधी किटचे वाटप

पंढरपूरला जाण्यासाठी १३ जूनला श्री. संत गजानन महाराज मंदिर पालखीने शेगाव, बुलढाणा जिल्ह्यातून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे. पालखी मार्गावर आतापर्यंत एक हजार ७४३ वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा देण्यात आली. गर्दीच्या ठिकाणी कमी वेळेत वैद्यकीय मदत मिळावी यासाठी मार्गावर एकूण २१२ दुचाकी रुग्णवाहिका (बाइक अॅम्बुलन्स) असणार आहेत. विविध दिंडी प्रमुखांना ५,८८५ औषधी ‘किट’चे वापट करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
लेकीच्या मृत्यूनंतर कुटुंबाला धक्का, तेराव्याच्या दिवशी आई गेली; दोघांच्या जाण्याने लेकासह बापानेही जीव सोडला

यंदाची वैशिष्ट्ये

– मुक्कामच्या प्रत्येक ठिकाणी पाच खाटांचा अतिदक्षता विभाग.

– एकूण ८७ अतिदक्षता विभागांची उभारणी.

– महिला वारकऱ्यांसाठी १३६ स्त्रीरोगतज्ज्ञांची नियुक्ती.

– मार्गावरील सर्व हॉटेल व त्याअंतर्गत असलेल्या कामगारांची आरोग्य तपासणी.

– विविध ठिकाणी पाणी नमुने तपासणी

– मुक्कामाच्या ठिकाणच्या स्वयंपाक घरांची तपासणी.

– पालखी मार्गावर १५६ टँकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करणार.

– मुक्कामाच्या ठिकाणी औषधांची फवारणी.

– पाण्याच्या सर्व स्रोतांची चाचणी होणार

– आरोग्य संस्थांमार्फत जैव कचरा विल्हेवाट लावणार.

– पालखी मार्गावर १३६ हिरकणी कक्षांची सुविधा.