महिला मतदारांमधील सर्वेक्षणानुसार महिलांचा दैनंदिन आणि स्थानिक प्रश्नांवरच भर, महिला म्हणतात..

प्रतिनिधी, पुणे : वृत्तवाहिन्यांवर निवडणूक विषयक बातम्या पाहण्याचे महिलांचे प्रमाण केवळ १२ टक्के असून, त्यातीलही ४५ टक्के महिला या त्या बातम्यांच्या आधारे मतदान करीत नसल्याची आकडेवारी स्त्री आधार केंद्र आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. महागाई कमी व्हावी, आरोग्यविषयक सेवा दर्जेदार व्हाव्यात, या मागणीबरोबरच व्यक्ती बघूनच मतदान करावे, असे मतही या सर्वेक्षणात महिलांनी मांडले आहे.स्त्री आधार केंद्र आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या वतीने २८ जिल्ह्यांतील महिला मतदारांमधील राजकीय सक्षमीकरणाचा आढावा घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याच्या दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणाची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या महिला निवडणूक प्रक्रियेबाबत जागरूक असल्याचे जाणवल्याचे त्या म्हणाल्या.
यंदा उन्हाळ्यात भाज्या स्वस्तच! ठोक बाजारात महिनाभरापासून दर जैसे थे, जाणून घ्या भाजीपाल्यांचे दर
निवडणुकीसंदर्भातील बातम्या या वृत्तवाहिन्यांवर पाहत नसल्याचे सर्वेक्षण ८८ टक्के महिलांना नोंदवले आहे. विचारपूर्वक योग्य उमेदवार निवडून देण्याची त्यांची मानसिकता आहे. महिलांना भेडसावणाऱ्या दैनंदिन प्रश्नांची त्यांना जाणीव आहे; तसेच त्यांचे प्रश्न स्थानिक उमेदवाराने सोडवावेत, असे त्यांना वाटते. चांगले रस्ते, पाणी, वीज आदींची व्यवस्था व्हावी, परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, महिला व मुलींची सुरक्षितता महत्त्वाची असून, त्यासाठी स्थानिक पातळीवर योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा महिलांना सर्वेक्षणादरम्यान व्यक्त केली.

‘महिलांसाठी आरोग्य शिबिरे, परवडणारे व मोफत औषधोपचार, लहान मुलांचे लसीकरण, भेसळयुक्त अन्नावर बंदी, महिलांना परवडणाऱ्या दरात सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करून दिले पाहिजेत,’ अशी अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली. महागाईची झळ सर्वसामान्य माणसाला बसत असून, महिलांना घरखर्च करताना खूप ओढाताण होते. गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल, वीजबिल, अन्नधान्य, डाळी, खाद्यतेल साखर, खाद्यपदार्थ, दुग्धजन्य पदार्थ, औषधे आदींच्या किमतीत कपातीची मागणी करण्यात आली आहे.

महिला म्हणतात…

– उमेदवाराने सामान्य माणसांची कामे वेळेत पूर्ण करावीत.

– पक्ष बघून नको, तर व्यक्ती बघून मतदान व्हावे.

– निवडणुकीवर होणारा खर्च चिंताजनक आहे.

– मतपत्रिकेद्वारे मतदान घेतल्यास विश्वासहार्यता वाढेल.

कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. महिला मतदारांचा राजकीय सक्षमीकरणाचा आढावा घेण्यासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग करण्यात येत आहे. महिलांची सुरक्षितता, महागाईची छळ, मुलभूत प्रश्नांची सोडवणूक, रस्ते, शेतीला हमीभाव त्याचबरोबर मतदानाप्रती असलेली उत्सुकता, या सर्वेक्षणातून जाणवली आहे.

– डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद