महाविकास आघाडीत ‘तिळे’ भाऊ, तिन्ही पक्षांना प्रत्येकी ९६ जागा, वादाविना सूत्र ठरलं

मुंबई : महाविकास आघाडी अभेद्य राहिली तरच लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही महायुतीचा पराभव शक्य असल्याचे आघाडीच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जागावाटपावरून निर्माण होणारे वितुष्ट आणि विलंब टाळण्याचे ठरवले आहे. जागांवरून विनाकारण दावे-प्रतिदावे करण्याऐवजी आघाडीतील प्रमुख तीन पक्षांनी वाटपात समसमान जागा घेण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू आहे. शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांचा ‘राष्ट्रवादी’ गट अशा तिन्ही पक्षांना प्रत्येकी ९६ जागा वाटून घ्यायच्या आणि आपल्या मित्रपक्षांना आपल्यातील जागा द्यायच्या अशा प्रकारचे वाटपाचे प्राथमिक सूत्र ठरत असल्याचे समजते. शिवाय मुख्यमंत्रिपदावरून हेवेदावे करण्याऐवजी ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री, अशा प्रकारचाही ‘फॉर्म्युला’ आघाडीच्या शीर्षस्थ नेत्यांमध्ये चर्चिला जात असल्याचे समजते.

लवकरात लवकर जागावाटप पूर्ण

लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला पराभवाचा धक्का दिल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केल्याने महायुतीला लोकसभेच्या ४८ पैकी केवळ १७ जागाच पदरात पाडून घेता आल्या. ठाकरे गटाची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात काही जागांवरून विशेषत: मुंबईतील जागांवरून शेवटच्या क्षणापर्यंत घासाघीस सुरू होती. मात्र, त्याचा त्यांना फारसा फटका बसला नाही. असे असले तरी आता विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र जागावाटप लवकर पूर्ण करून प्रचारासाठी कसा जास्तीचा वेळ मिळेल, त्यावर आघाडीच्या नेत्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. जागावाटप लवकर पूर्ण करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत दावे-प्रतिदावे करताना जागांसाठी घासाघीस करण्याचे कसे टाळता येईल, यावर आघाडीचे नेते रणनीती आखत आहेत.
Devendra Fadnavis : लोकसभेतील अपयश सामूहिक, ‘एक अकेला देवेंद्र’ जबाबदार नाही, केंद्रीय नेतृत्वाचं स्पष्टीकरण

महाविकास आघाडी एकसंध ठेवण्यासाठी सूत्र

राज्यात २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ५६ जागांवर विजय मिळाला होता. त्या खालोखाल शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने ५४, तर काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या होत्या. आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांत फूट पडली असून, या दोन्ही पक्षांतील आमदार कमी-जास्त प्रमाणात दोन गटांत विभागले आहेत. त्यामुळे मागच्या संख्याबळाच्या आधारावर या दोन्ही पक्षांना दावे करणे कठीण बनणार आहे. आता मागच्या कामगिरीच्या आधारे वाद-प्रतिवाद करीत बसण्यापेक्षा भाजप आणि मित्रपक्षांच्या विरोधातील जनतेचा रोष विधानसभेतही कायम ठेवायचा असेल तर महाविकास आघाडी एकसंध ठेवायलाच हवी आणि त्यासाठी कोणत्याही वादाविना जागावाटप व्हायला हवे यावर आघाडीच्या नेत्यांमध्ये एकमत झाल्याचे समजते.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

वादविरहित जागावाटपावर भर

विनाकारण जागांचा हट्ट धरण्यापेक्षा समसमान जागा अर्थात शिवसेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षांना प्रत्येकी ९६ जागा यानुसार वाटप करण्याचा अजेंडा समोर ठेवून या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी बैठकींचा श्रीगणेशा करण्याचे ठरवल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. विशेष म्हणजे कोणत्याही वादाविना जागावाटप पार पडावे, यासाठी ठाकरे गटाचे नेतृत्व पुढाकार घेत असल्याचे समजते. जास्तीच्या जागा मागून घेण्यापेक्षा समसमान जागा वाटून घेऊन त्यातील जास्तीत जास्त जागा जिंकण्यावर भर द्यायला हवा, अशा प्रकारची गंभीर चर्चा आघाडीच्या शीर्षस्थ नेत्यांमध्ये घडल्याचे समजते. काही जागांवरून अगदीच वाद वाढला तर ऐनवेळी वाटपाच्या सूत्रात काहीअंशी बदल करता येईल. मात्र, शक्यतो समसमान जागा हेच सूत्र राहावे, असा या नेत्यांचा आग्रह असल्याचे समजते.