महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षपदी राज ठाकरेच राहणार आहेत. आज पक्षाच्या झालेल्या विशेष बैठकीत त्यांच्या नावावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी यासंदर्भातील ठराव आजच्या बैठकीत मांडला होता. त्याला नितीन सरदेसाई यांनी अनुमोदन दिले आहे. २०२३ ते २०२८ या कालावधीपर्यंत त्यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. याशिवाय आणखीन दोन ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आले असून यात राज ठाकरे यांना सर्वाधिक देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
त्याशिवाय शिस्तभंग आणि इतर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे अधिकारही राज ठाकरे यांनाच असतील, अशा प्रकारचा ठराव आज मंजूर करण्यात आला आहे. यात पक्षातील नेमणुका करण्यासंदर्भातही ठराव मंजूर करतानाच त्याचे सर्वाधिकार राज ठाकरे यांना देण्यात आले आहे. दरम्यान यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. राज ठाकरेंनी पुण्यात मुरलीधर मोहोळ, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे, ठाण्यात नरेश म्हस्के यांच्यासाठी सभा घेतली होती. आता विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेची जय्यत तयारी सुरू केली आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.