स्मार्ट मीटरबाबत मुनगंटीवार म्हणाले…
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन आयोजित ‘मटा कॅफे’मध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यातील भ्रष्टाचार तसेच लोकसभा निवडणुकींच्या लागलेल्या निकालाबाबत मोकळेपणाने भाष्य केले. स्मार्ट मीटरसंदर्भात त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ”आम्ही देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली की, कारण नसताना जनतेला ही भूमिका पटत नसेल तर, ताबडतोब या निर्णयाला स्थगिती द्यावी आणि फडणवीसांनी त्याला स्थगिती दिली”. त्यामुळे त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’च्या माध्यमातून जनतेला आवाहन देखील केले. ते म्हणाले की, ”असे गैरसमज पसरवणाऱ्यांपासून सावध राहा. पोस्टपेड किंवा प्रीपेड अशा कोणत्याही मीटर लावायला स्थगिती देण्यात आली आहे. जर तुम्हाला आपल्या कोणत्या भागात जाणवलं तर, स्थानिक आमदारांना नक्की भेटा. स्मार्ट मीटर फक्त आणि फक्त सरकारी कार्यालयांमध्ये लागणार आहेत. योग्य नियोजन व्हावं म्हणून हे मीटर लावण्यात येणार आहेत, असं म्हणत मुनगंटीवार यांनी हा मुद्दा अधोरेखित केला.मोदींनी सांगितले होते १५ लाख जमा होतील, पण…
काळा पैसा भारतात येणार असल्याचं २०१४ला सांगण्यात आलं होतं. मोदींनी त्यावेळी सांगितलं होतं की, बाहेर देशांच्या स्विस बॅंकेत एवढा काळा पैसा आहे की प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख जमा होतील. याबाबत मुनगंटीवार यांना प्रश्न केला असता ते म्हणाले की, ”नरेंद्र मोदी तुमच्या बॅंक खात्यात १५ लाख देतो असं कधीच म्हणाले नाहीत. असा एकही व्हिडिओ नाहीय. तेव्हा मोदी म्हणाले होते की, स्विस बँकेत जो पैसा आहे, तो आणण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे. तो पैसा जर भारतात आणला तर इतका पैसा आहे की, त्या अनुषंगाने एकेका व्यक्तीच्या वाट्याला एवढा पैसा येईल”, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.