महायुती की ‘मविआ’कोणाच्या विजयाची चावी बनणार महिलांचं मतदान? आकडेवारीसह समजून घ्या

वीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं तर तेवीस नोव्हेंबरला म्हणजे उद्या मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचं प्रमुख वैशिष्ट ठरलं ते म्हणजे लाडकी बहीण योजना आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या महिलांच्या मतांची टक्केवारी. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 3 कोटी 34 लाख 37 हजार 57 पुरुषांनी तर 3 कोटी 6 लाख 49 हजार 318 महिलांनी आणि 1,820 अन्य जणांनी मतदान केलं. राज्यात महिला मतदारांच्या तुलनेत पुरुष मतदारांची संख्या जास्त आहे.पुरुष मतदारांची संख्या महिला मतदारांच्या तुलनेत 30,26,460 ने जास्त आहे. मात्र राज्यातील 12 विधानसभा मतदारसंघ असे होते जिथे पुरुषांपेक्षा महिलांचं मतदान जास्त झालं.

महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील मतदारसंघ आणि विदर्भातील काही मतदारसंघात महिलांनी पुरुषांच्या तुलनेत जास्त मतदान केल्याचं समोर आलं आहे. शनिवारी म्हणजे उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे, त्यामध्ये जीथे महिलांच्या मतांची टक्केवारी वाढली त्या विधानसभेतील मतदारांनी कोणाच्या बाजुनं कौल दिला? महाविकास आघाडी की महायुती हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यात पुरुषांच्या तुलनेत महिलांचं अधिक मतदान झालं.महिलांचं 94 मतदान अधिक झालं. इथे 1,18,826 पुरुषांनी मतदान केलं तर 1,18,920 एवढं महिलांचं मतदान झालं. नवापूरमध्ये देखील महिलांचं मतदान पुरुषांच्या तुलनेत अधिक झालं.पुरुषांच्या तुलनेत 1,808 महिलांनी जास्त मतदान केलं.विदर्भात नागपूर दक्षिण पश्चिममध्ये देखील महिलांचं मतदान अधिक झालं. या मतदारसंघात पुरुषांच्या तुलनेत 2,316 एवढं महिलांचं अधिक मतदान झालं आहे.

दरम्यान दुसरीकडे कोकणात देखील काही विधानसभा मतदारसंघात महिलांच्या मतांची टक्केवारी ही पुरुषांच्या मतांपेक्षा अधिक आहे. ज्यामध्ये रत्नागिरी सारख्या काही मतदारसंघाचा समावेश आहे. दरम्यान एक्झिट पोलनुसार विदर्भात महायुतीला अधिक जागा येताना दिसत आहेत, तर कोकणात देखील महायुतीच्या अधिक जागा येण्याचा अंदाज आहे. या दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीला फटका बसताना दिसत आहे, त्यामुळे वाढलेल्या महिलांच्या मतांचा फायदा हा महायुतीला झाला का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे? उद्या सर्वच चित्र स्पष्ट होणार आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)