विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार मैदानात उतरल्याने या निवडणुकीत फाटाफूट ही निश्चितच होती. भाजपकडून पाच, शिवसेनेकडून दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन असे नऊ उमेदवार महायुतीकडून उभे राहिले; तर महाविकास आघाडीमधील काँग्रेसकडून एक, शिवसेना उबाठाकडून एक आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत एक असे तीन उमेदवार रिंगणात उतरले. ११ जागांसाठी १२ उमेदवार असल्याने आता कोण कोणाला पाडणार, याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
शरद पवारांना दादा गटातून ठेंगा
महायुतीच्या संख्याबळानुसार त्यांना नऊ उमेदवार निवडून आणणे कठीण नव्हते. महाविकास आघाडीच्या संख्याबळानुसार त्यांच्या एका उमेदवाराला अर्थात, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसपुरस्कृत जयंत पाटील यांना सर्वाधिक धोका असल्याची चर्चा पहिल्या दिवसापासूनच होती. मात्र, शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत १० पैकी ८ खासदार निवडून आणल्याने अजित पवार यांच्याकडील अनेक आमदारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत परतण्याचा मानस व्यक्त केल्याची चर्चा सुरू झाली. ज्यांना परत यायचे आहे त्यांनी आपल्या निष्ठा व्यक्त करण्यासाठी आधी विधान परिषदेत मदत करा आणि मगच परतीचा प्रवास सुरू करा अशा प्रकारचा निरोप अजित पवार गटातील आमदारांना गेल्याचेही खासगीत सांगितले जाऊ लागले. त्यामुळे असे खरेच घडले तर अजित पवारांचा एखादा उमेदवार पडेल, असा तर्क लढवायला सुरुवात झाली.
वास्तविक ज्या ज्या आमदारांना शरद पवार गटाकडून फोन गेले त्या-त्या आमदारांनी याबाबत आधीच अजित पवारांना कल्पना देत आपल्या निष्ठा अजित पवारांनासोबतच असल्याचे स्पष्ट केल्याचे समजते. अजित पवारांचे आमदार एकीकडे एकत्रित राहिले असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसमधील मतांची काही बेगमी महायुतीच्या उमेदवारांसाठी केली.
काँग्रेसची सहा मते फुटल्याची जोरदार चर्चा
या निवडणुकीत विजयासाठी २३ मतांचा कोटा ठेवण्यात आला होता. काँग्रेसकडे ३७ मते होती. प्रज्ञा सातव यांना २७ मतांचा कोटा देण्यात आला होता; मात्र प्रत्यक्षात त्यांना २५ मते मिळाली. त्यामुळे तिथे दोन मते फुटल्याचे समजते. सातव यांना २७ मतांचा कोटा देऊन काँग्रेसची उर्वरित १० शिल्लक मते महाविकास आघाडीच्या उमदेवारांना अर्थात, मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांना देण्याचे निश्चित करण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे १७ मते होती. त्यामुळे उबाठाच्या मिलिंद नार्वेकर यांना काँग्रेसच्या सहा मतांची गरज होती. ही मते मिळाली असती तर नार्वेकरांना विजयासाठीची २३ मते मिळाली असती; परंतु प्रत्यक्षात नार्वेकर यांना २२ मते मिळाली. म्हणजेच काँग्रेसचे मत तिथेही फुटल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे महायुतीच्या नेत्यांनी काँग्रेसची उर्वरित मते जयंत पाटील यांच्याऐवजी नार्वेकर यांना कशी मिळतील, याची रणनीती केल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. याशिवाय महायुतीच्या नेत्यांनी छोट्या पक्षांची मतेही नियंत्रित केल्याचे समजते. काँग्रेसची सहा मते फुटल्याची जोरदार चर्चा निकालानंतर विधिमंडळ आवारात सुरू झाली होती.
कोणी कोणाला खेळवले?
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे ४२ मते होती. त्यांनी दोन उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांना २३ मते मिळाली. तर शिवाजीराव गर्जे यांना २४ मते मिळाली. राष्ट्रवादीला या निवडणुकीत चार मतांची गरज होती; परंतु प्रत्यक्षात त्यांना ४७ मते मिळाली. म्हणजेच पाच अतिरिक्त मते त्यांना मिळाली. त्यामुळे काँग्रेसच्या सात मतांपैकी सर्वाधिक मते फोडण्यात महायुतीला यश आल्याचे दिसते.