सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सुरु असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचा सभापती निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. सत्ता कायम राहील की नाही याबद्दल साशंकता असल्यानं भाजपनं विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी मोर्चेबांधणी केली आहे. पुढील अधिवेशन विधानसभा निवडणुकीनंतर होईल. त्यामुळे आताच आपला सभापती बसवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
येत्या आठवड्यात मंगळवारी किंवा बुधवारी विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक होऊ शकते. सत्तेत असलेल्या घटक पक्षांपैकी कोणीही भाजपच्या उमेदवाराला विरोध करणार नाही. राम शिंदे पुढील सभापती असू शकतात. ते धनगर समाजाचे आहेत. लोकसभा निवडणुकीत हा समाज महायुतीपासून दूर गेला, असं भाजपच्या परिषदेतील एका वरिष्ठ आमदारानं सांगितलं. राज्यात धनगर समाजाची लोकसंख्या १० टक्के आहे. शिंदेंना संधी देऊन भाजप विधानसभेच्या तोंडावर समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करेल.
विधान परिषदेच्या सभापतीची निवडणूक घेण्याच्या आधी सत्ताधाऱ्यांना त्याची माहिती सदनाला द्यावी लागते, अशी माहिती परिषदेचं कामकाज पाहणाऱ्या अधिकाऱ्यानं दिली. तीन दिवसांपूर्वी ही माहिती देणं अपेक्षित असतं. त्यामुळे ११ किंवा १२ जुलैला सभापती पदाची निवडणूक होईल, असा अंदाज अधिकाऱ्यानं वर्तवला.
२०२२ मध्ये रामराजे निंबाळकर यांचा सभापती पदाचा कार्यकाळ संपला. ते निवृत्त झाले. पण त्यावेळी एकसंध असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना पुन्हा एकदा परिषदेवर पाठवलं. ते निवडून आले. पण सभागृहाचं सभापतीपद ८ जुलै २०२२ पासून रिक्त आहे. सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात विरोधकांनी सभापतीपदाची निवडणूक घेण्याची मागणी लावून धरली. यासाठी कॅबिनेटची मंजुरी लागेल, अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली होती.