महायुतीचा ‘क्लिन स्वीप’: महाराष्ट्रात हिंदूंची वज्रमूठ अन्‌ लाडक्या बहिणीचा मोठा आशिर्वाद! | Mahaenews

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले. भारतीय जनता पार्टीने राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक ‘स्ट्राईक रेट’ मिळवला असून, 128 जागांवर जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना शिंदे गटाने 54 जागांवर, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 35 इतक्या जागांवर आघाडी मिळवली आहे. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपदही मिळणार नाही, अशी स्थिती आहे. एकूणच महायुतीने विधानसभा विडणुकीत ‘क्लिन स्विप’ दिला असून, मविआचा अरक्षश: सुपडा साफ झाला आहे.

लोकसभा निवडणुकीत हिंदू मतांचे विभाजन झाले. त्यामुळे महाविकास आघाडी आणि काँग्रेसला मोठा फायदा झाला होता. त्यानंतर भाजपा महायुतीने हिंदू मतांचे विभाजन होवू नये. या करिता रणनिती आखली. तसेच, राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवण्यात आली. तसेच, ‘व्होट जिहाद विरुद्ध भगवा जिहाद’ ही घोषणा केली. त्याचा फायदा भाजपा महायुतीला झाला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागत आहेत. जे पहिले कल हाती येत आहेत त्यानुसार महायुतीच्या २२० हून अधिक जागा आघाडीवर आहेत. या दरम्यान भाजपा नेते प्रवीण दरेकर यांची महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे. ज्या पक्षाच्या जागा जास्त असतील त्यांचा मुख्यमंत्री होईल. भाजपाच्या जागा जास्त येत आहेत हे दिसून येतं आहे. आमच्या जवळपास १२५ जागा येतील त्यामुळे महायुतीचा मुख्यमंत्री होईल हे स्पष्ट आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील का? असं विचारलं असता त्यांनी होय असं उत्तर दिलं आहे.

महाराष्ट्रात २०१९ ला महायुतीला कौल मिळाला होता. भाजपाला १०५ जागा आणि शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या होत्या. महायुतीला जनतेने कौल दिला होता. मात्र मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्यावरुन भाजपा आणि शिवसेना यांच्यातले वाद विकोपाला गेले आणि त्यानंतर महायुती तुटली. या घटनेनंतर महाविकास आघाडी स्थापन झाली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्ष येऊन सरकार उदयाला आलं आणि उद्धव ठाकरे अडीच वर्षे या सरकारमध्ये मुख्यमंत्री होते. त्यानंतर २०२२ ला हे सरकार पडलं. २०२३ ला अजित पवारही महायुतीच्या सत्तेत आले.

प्रवीण दरेकर यांनी काय म्हटलं आहे?

“लोकांनी विकासाच्या बाजूने मतदान केली. धर्मयुद्ध आणि एक है तो सेफ है चा नारा जनतेने मान्य केला आहे. आता राज्याचा विकास वेगाने होईल. महायुतीने २०० जागांवर आघाडी घेतली आहे. मी जनतेला नमन करतो, लाडक्या बहिणींना सलाम करतो. एवढंच नाही तर खरी शिवसेना कोण याचं उत्तरही जनतेने दिलं आहे. महायुतीचा मुख्यमंत्री होईल. जो पक्ष सर्वात मोठा असेल त्याचा मुख्यमंत्री होईल. मला वाटतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील.”

भाजपा १३१ जागांवर आघाडीवर आहेत

आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार, अशी चर्चा सुरु झाली आहे. महायुतीमध्ये भाजपा १३१ शिंदे सेना ५५ आणि अजित पवार गट ३५ जागांवर आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार अवघ्या ६० जागांवर आघाडीवर आहेत. मविआत काँग्रेस २२, ठाकरे गट २० आणि शरद पवार गटाचे १६ उमेदवार आघाडीवर आहेत.

एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊन राज्यात महायुतीची सत्ता स्थापन केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यात मुख्यमंत्री म्हणून जम बसवला होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपने एकट्याच्या बळावर ११० जागांची संख्या पार केल्याने आता देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदावरील दावा आणखी भक्कम झाला आहे. भाजप नेतृत्त्वाने विधानसभा निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली लढवत असल्याचे सांगितले होते. मात्र, आता निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर मुख्यमंत्रीपदी भाजपचाच नेता बसेल, याबद्दलची शक्यता वाढली आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)