महानिर्मिती कंपनी ‘महावितरण’ला वीज विक्री करते. त्यानुसार २८ मार्चला ‘महावितरण’ने २५ हजार ८२९ मेगावॉट या कमाल मागणीचा उच्चांक गाठला. त्या वेळी जलविद्युतचे उत्पादन मर्यादित असल्याने महानिर्मिती कंपनी कमाल आठ हजार ४९९ मेगावॉट वीजच पुरवू शकली होती. आता मात्र मागील चार दिवसांत ‘महानिर्मिती’ने दमदार वीज उत्पादन सुरू केले आहे.
‘महानिर्मिती’ने कंपनीने मागील आठवड्यात कमाल १० हजार ५७६ मेगावॉट वीज उत्पादन करताना त्यात औष्णिकचा वाटा आठ हजार २२०, वायूआधारित विजेचा वाटा ४४४ व जलविद्युतमधील वीजनिर्मितीचा वाटा एक हजार ८९४ मेगावॉट इतका होता. यामध्ये कोयना जलविद्युत केंद्राचा वाटा एक हजार ८३५ मेगावॉट होता, हे विशेष.
रात्रीच्या वेळी दमदार वीजनिर्मिती
महानिर्मिती कंपनीने रात्रीच्या वेळी कमाल क्षमतेने वीज उत्पादन सुरू केले आहे. दिवसा सौर प्रकल्पांमधून वीज घेतली जात आहे; मात्र त्याची क्षमता कमी असल्याने एकूण उत्पादन दिवसा कमी होत आहे. रात्री मात्र जलविद्युत व औष्णिक या दोन्ही क्षेत्रांतील प्रकल्प कमाल क्षमतेने चालविले जात असल्याने दमदार वीजनिर्मिती होत आहे.
‘सुयोग्य व्यवस्थापनाचे फलित’
‘महानिर्मितीकडून कोळसा साठा नियोजनबद्धरितीने ठेवला जात असताना सरासरी १६ ते १८ दिवसांचा व काही प्रकल्पांत २५ दिवसांचादेखील कोळसा साठा आहे. कोयनेतील पाण्याचादेखील सुयोग्य वापर करून अधिकाधिक वीजनिर्मिती केली जात आहे. विक्रमी उत्पादन हे सुयोग्य व्यवस्थापनाचेच फलित आहे,’ असे ‘महानिर्मिती’चे संचालक (परिचालन) संजय मारुडकर यांनी सांगितले.