महादेव बेटिंग ॲपप्रकरणी महाराष्ट्र कनेक्शन समोर; पुण्यात छापा, ९० जण ताब्यात

नारायणगाव, पुणे : जगभरात प्रसिद्ध असलेल्या महादेव बेटिंग ॲप मनी लॉन्ड्रींग घोटाळ्याची लिंक आता पुणे जिल्ह्यातील नारायणगावपर्यंत येऊन पोहचली आहे. या बॅटिंगसाठी नारायणगाव येथील संपूर्ण बिल्डिंग वापरण्यात येत होती, अशी माहिती समोर आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकल्यानंतर हे प्रकरण समोर आले. यात पोलिसांनी जवळपास ९० जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.महादेव बेटिंग प्रकरण समोर आले तेव्हा देशातील विविध राज्यांसह परदेशातही कारवाई करण्यात आली होती. आता याच प्रकरणी नारायणगावात पोलिसांनी कारवाई करत याचे महाराष्ट्र कनेक्शन समोर आणल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Pune News : बुरशी लागलेली औषधे विकणाऱ्या कंपन्यांना दणका, ग्राहकाला द्यावी लागणार एक लाख रुपयांची नुकसान भरपाई
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महादेव बुक आणि लोटस ३६५ या दोन वेबसाईट संबंधित पेमेंटचे प्रोसेसिंग या ठिकाणाहून होत होते. त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल अन्य वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. यात मुख्य सूत्रधार म्हणून नारायणगाव आणि जुन्नर येथील दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या ठिकाणी ही बॅटिंग सुरू होती. सध्या सर्वांवर पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

यापूर्वी देखील राज्यभरात अशा कारवाया केल्या गेल्या आहेत. या कारवाईचे धागे कुठपर्यंत पोहचतात हे तपासाअंती समोर येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. नारायणगाव येथील मुख्य भागात ही छापेमारी झाल्याने संपूर्ण जुन्नर तालुका या घटनेने हादरला आहे. सध्या पोलिसांकडून पंचनामा करण्याची प्रोसेस सुरू आहे. दोन – तीन दिवसांत यात आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.